‘किती जुनं नाव..’; मुलाच्या नावावरून झहीर खान-सागरिका घाटगे ट्रोल
माजी क्रिकेटर झहीर खान आणि त्याची पत्नी सागरिका घाटगे यांच्या कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. या दोघांनी त्यांच्या मुलाचं नाव फतेहसिंह खान असं ठेवलंय. इन्स्टाग्रामवर चिमुकल्यासोबतचे फोटो पोस्ट करत त्यांनी चाहत्यांनी ही गुड न्यूज दिली. या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. हरभजन सिंग, अनुष्का शर्मा, अंगद बेदी यांनी फोटोवर कमेंट करत झहीर आणि सागरिकाला शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये झहीर आणि सागरिका त्यांच्या चिमुकल्या बाळाला कुशीत घेतल्याचं पहायला मिळालं. ‘प्रेम, कृतज्ञता आणि दैवी आशीर्वादाने आमच्या आयुष्यात चिमुकल्या बाळाचं आगमन झालं आहे, फतेहसिंग खान’, असं त्यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. परंतु मुलाच्या नावावरून काही नेटकऱ्यांनी झहीर आणि सागरिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
‘इतकं जुनं नाव का ठेवलंय, काहीतरी चांगलं नाव ठेवायचं ना’, असं एका युजरने लिहिलंय. तर ‘नशिब यांनी तैमुर किंवा औरंगजेब असं काही नाव नाही ठेवलं’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘ओल्ड फॅशन नाव’, असंही एका नेटकऱ्याने लिहिलं आहे. झहीर आणि सागरिका हे लग्नाच्या आठ वर्षांनंतर आई-बाबा झाले आहेत. या दोघांनी 2016 मध्ये क्रिकेटर युवराज सिंग आणि हेजल कीच यांच्या लग्नात त्यांचं रिलेशनशिप जाहीर केलं होतं. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2017 रोजी ते लग्नबंधनात अडकले.
झहीर हा भारतीय क्रिकेट संघातील अत्यंत लोकप्रिय क्रिकेटर होता. तर सागरिकाने शाहरुख खानच्या ‘चक दे इंडिया’ या चित्रपटात प्रिती सबरवालची भूमिका साकारून प्रकाशझोतात आली होती. सागरिकाचा हा बॉलिवूडमधील पहिलाच चित्रपट होता. त्यानंतर तिने मराठी चित्रपटातही काम केलं. करिअरच्या शिखरावर असताना सागरिकाने 2017 मध्ये भारतीय क्रिकेटर झहीर खानशी लग्न केलं. झहीर खान आणि सागरिकाची जोडी सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. लग्नानंतर सागरिका चित्रपटांपासून दूर गेली. मात्र ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.
अभिनेता अंगद बेदीच्या एका पार्टीत झहीर आणि सागरिकाची एकमेकांशी पहिल्यांदा भेट झाली होती. “आमच्या स्वभावात खूप साम्य आहे. त्यामुळे लग्नाच्या वेळी फारशा समस्या आल्या नव्हत्या. दोघांच्या कुटुंबीयांनीही साथ दिली होती. क्रिकेट असो किंवा इतर कोणत्याही गोष्टी असो, झहीरच्या विचारांमध्ये खूप स्पष्टता असते. त्यामुळे आम्ही दोघांनी हे नातं पुढे नेण्याचा विचार केला होता,” असं सागरिकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List