दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार; गझलगायक भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, अनुपम खेर यांना राज कपूर जीवनगौरव
चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ नामवंत अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. तर यंदाचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ मराठीतील ज्येष्ठ गझलगायक भीमराव पांचाळे यांना घोषित करण्यात आला आहे. प्रत्येकी दहा लाख रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. येत्या 25 एप्रिल रोजी एनएससीआय डोम, वरळी, मुंबई येथे एका भव्य समारंभात या पुरस्कारांचे वितरण केले जाईल.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी आज या पुरस्कारांची घोषणा केली. त्यानुसार हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षासाठी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित करणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा ‘स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ घोषित झाला आहे. तर ‘स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण यांना जाहीर झाला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप अनुक्रमे दहा लाख आणि सहा लाख रुपये, स्मृतिचिन्ह तसेच मानपत्र, चांदीचे पदक असे आहे.
‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ यंदा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार असून सहा लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि चांदीचे पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
20 एप्रिलला संविधान अमृत महोत्सव कार्यक्रम
दरम्यान, या सोहळय़ाशिवाय संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे 20 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे एक खास सांगीतिक मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, नंदेश उमप आदी कलाकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीतं, नाटय़प्रवेश आणि नृत्य सादर केले जातील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List