‘त्याच्या डोळ्यात बोचत राहू, धाय मोकलून रडेल तो..’; ट्रोलिंगबद्दल सलील कुलकर्णी यांची मार्मिक कविता
सेलिब्रिटी आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंग हे आजकाल जणू समीकरणच बनलं आहे. सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर काहीही पोस्ट केलं तरी अनेकदा त्यावर नकारात्मक प्रतिक्रियांचा भडीमार होतो. काहीजण या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देणं पसंत करतात. तर काहीजण त्याकडे दुर्लक्ष करतात. हे रोज असंच चालू राहणार म्हणत अनेकजण त्याकडे कानाडोळा करतात. परंतु अशा ट्रोलिंगमुळे खचलेल्या सेलिब्रिटींची अनेक उदाहरणंही पहायला मिळतात. याच ट्रोलर्सबद्दल आणि ऑनलाइन ट्रोलिंग करणाऱ्यांच्या वृत्तीबद्दल सलील कुलकर्णी यांनी अत्यंत मार्मिक कविता लिहिली आहे. ‘नवीन डेटा पॅक दे रे..’ अशी ही त्यांची कविता आहे. या कवितेचे बोल तुम्हालाही विचार करायला भाग पाडतील.
सलील कुलकर्णी यांची कविता-
नवीन डेटा पॅक दे रे.. आभाळावर थुंकीन म्हणतो
रोज वेगळं नाव लावून, लपून लपून भुंकीन म्हणतो..
याच्यासाठी काही म्हणजे काही सुद्धा लागत नाही.. कोणी इथे तुमच्याकडे डिग्री वगैरे मागत नाही
कष्ट नको, ज्ञान नको, विषयाचीही जाण नको.. आपण नक्की कोण कुठले ह्याचे सुद्धा भान नको
खूप सारी जळजळ हवी, विचारांची मळमळ हवी.. दिशाहीन त्वेष हवा, विनाकारण द्वेष हवा
चालव बोटे धारदार शब्दांमधून डंख मार.. घेरून घेरून एखाद्याला वेडा करून टाकीन म्हणतो
नवीन डेटा पॅक दे रे.. आभाळावर थुंकीन म्हणतो
खाटेवरती पडल्या पडल्या जगभर चिखल उडव.. ज्याला वाटेल जसे वाटेल धरून धरून खुशाल बडव
आपल्यासारखे आहेत खूप खोटी नावे, फसवे रूप.. जेव्हा कोणी दुबळे दिसेल अडचणीत कोणी असेल
धावून धावून जाऊ सारे, चावून चावून खाऊ सारे.. जोपर्यंत तुटत नाही धीर त्याचा सुटत नाही, सगळे मिळून टोचत राहू
त्याच्या डोळ्यात बोचत राहू, धाय मोकलून रडेल तो.. चक्कर येऊन पडेल तो
तेवढ्यात दुसरे कोणी दिसेल, ज्याच्यासोबत कोणी नसेल
आता त्याचा ताबा घेऊ, त्याच्यावरती राज्य देऊ.. मग घेऊन नवीन नाव, नवा फोटो, नवीन डाव
त्याच शिव्या, तेच शाप.. त्याच शिड्या, तेच साप..
वय, मान, आदर, श्रद्धा.. सगळं खोल गाडीन म्हणतो.. जरा कोणी उडले उंच त्याला खाली पाडीन म्हणतो
थोडा डेटा खूप मजा, छंद किती स्वस्त आहे.. एका वाक्यात खचते कोणी फीलिंग किती मस्त आहे
नवीन डेटा पॅक दे रे.. आभाळावर थुंकीन म्हणतो
ही कविता कशी सुचली, त्याबाबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय. ‘एक निरीक्षण.. अशा निनावी आणि चेहरे नसलेल्या माणसांचं. कुठून येतात ही माणसं? कुठून येते ही वृत्ती? कोणाविषयीच आदर न वाटणारी. ते एखादंच वाईट वाक्य बोलतात. पण जो ऐकत असतो, त्याने ऐकलेलं त्या दिवसातले 100 वे वाईट वाक्य असेल आणि त्याचा तोल ढळला तर? तो जगण्यावर रुसला तर? अशी भीतीसुद्धा वाटत नाही ह्यांना? या वृत्तीच्या माणसांच्या मनातल्या अंधारात डोकावून पाहायचा प्रयत्न करताना ही कविता सुचली’, असं त्यांनी म्हटलंय.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List