दीनानाथ, सूर्या, मणिपालमधील उपचारांची ससून करणार चौकशी
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांसाठी उपचार नाकारल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची आता ससून रुग्णालयातील समिती चौकशी करणार आहे. या प्रकरणात डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाला आहे का? गर्भवती महिलेला देण्यात आलेले उपचार योग्य होते का? याचा तपास ससूनच्या चौकशी समितीकडून केला जाणार आहे. तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, सूर्या हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटलमध्ये देण्यात आलेल्या उपचारांची चौकशी या समितीकडून केली जाणार आहे.
ससून रुग्णालयाच्या चौकशी समितीची प्राथमिक बैठक झाली असून, मंगळवारपासून या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात होणार आहे. तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या नातेवाईकांनी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर पोलिसांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, सूर्या हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटल या रुग्णालयांमध्ये नेमके काय घडले, याचा चौकशी अहवाल ससून प्रशासनाला दिला होता. तसेच ससूनच्या चौकशी समितीने या प्रकरणाची चौकशी करावी, असेही पत्रात नमूद केले होते. त्यानुसार ससूनच्या चौकशी समितीकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी राज्य आरोग्य विभागाची चौकशी समिती, धर्मादाय आयुक्त समिती आणि महापालिका आरोग्य विभागाच्या मातामृत्यू अन्वेषण समितीने या प्रकरणाची चौकशी केली असून, या तिन्ही समित्यांकडून चौकशी अहवाल सरकारला सादर करण्यात आले आहेत.
रुग्णाला उपचार देताना डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाला का? याचा तपास करण्यासाठी सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांची समिती नेमली जाते. एखाद्या रुग्णाने किंवा नातेवाईकांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणाबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यास पोलिसांकडून या समितीला चौकशी करण्याबाबतचे पत्र दिले जाते. त्यानंतर ही समिती संबंधित प्रकरणाची चौकशी करते.
या समितीमध्ये वैद्यकीय अधीक्षक, मेडिसिन विभाग आणि न्यायवैद्यक विभागाच्या प्रमुखांचा समावेश असतो. या प्रकरणात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असल्याने चौकशी समितीमध्ये प्रसूती विभागाच्या प्रमुखांचाही समावेश होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List