एल्फिन्स्टनचा पूल कोणत्याही क्षणी पाडणार; परळ-प्रभादेवी… पाच मिनिटांच्या अंतराला होणार पाऊण तासांची फरफट

शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूला जोडणाऱ्या वरळी-शिवडी उन्नत मार्गासाठी दीडशे वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल कोणत्याही क्षणी तोडण्यात येणार असल्यामुळे प्रभादेवीहून परळला जाण्यासाठी पाच मिनिटांच्या प्रवासाला तब्बल पाऊण तासाची फरफट होणार आहे. परळ परिसरातील केईएम, वाडिया, टाटा आदी रुग्णालयांमध्ये जाणाऱया रुग्णवाहिकादेखील रखडणार असून 1 किमी अंतराच्या जागी तब्बल चार ते पाच किमीचा वळसा पडणार आहे. यामुळे रुग्णांचेदेखील हाल होणार असून दादरचे टिळक ब्रिज आणि करी रोड ब्रिज परिसरात प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
न्हावाशेवा-शिवडी मार्गाला आता वरळीहून कनेक्टरच्या माध्यमातून ब्रिज जोडला जाणार आहे. या 4.5 किमी कनेक्टरमुळे दादर, वरळी आणि वांद्रे परिसरातून अटल सेतूवर जाता येणार आहे. मात्र दक्षिण मुंबईच्या वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरणारा हा ब्रिज पर्यायी मार्ग उपलब्ध करून न देता तोडल्यास संपूर्ण परिसरातच मोठी वाहतूक कोंडी होणार आहे.
आधी पादचारी पूल बांधा
ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलासोबत आम्हा स्थानिकांच्या खूप आठवणी जोडलेल्या असल्याने हा पूल जमीनदोस्त होतोय याचे नक्कीच वाईट वाटतेय. एल्फिन्स्टन ब्रिज तोडल्यास स्थानिक रहिवाशांसह प्रभादेवी स्थानकाच्या पश्चिमेकडून येणारे व स्थानकात उतरून पूर्वेकडे येणारे रुग्ण, विद्यार्थी, कामगार, कर्मचारी वर्गाची मोठी गैरसोय होणार आहे. या सर्वांना दादरचा टिळक ब्रिज किंवा करी रोडच्या पुलाचा वापर करावा लागेल. त्यामुळे प्रभादेवी स्थानकाच्या पश्चिमेकडून पूर्वेला सेंट्रल रेल्वे वर्कशॉपपर्यंत पादचारी पूल तयार होईपर्यंत एल्फिन्स्टन पूल पाडू नये, अशी मागणी स्थानिक रहिवासी अभिजीत मुरूडकर यांनी केली.
- दादरच्या टिळक ब्रिजच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. यासाठी महारेलने प्लाझाकडून दादर टीटीच्या दिशेने जाणाऱया रोडवर बॅरिकेड्स लावले आहेत. त्यामुळे वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यानाकडून दादार टीटीकडे जाणारा रस्ता निमुळता झाल्यामुळे 20 मिनिटे रखडपट्टी होत आहे.
शीव येथील पूल बंद असल्यामुळे टिळक पुलावर वाहनांची संख्या दुपटीने वाढली आहे. सायंकाळी वीर कोतवाल उद्यान सर्कलजवळ प्रचंड वाहतूक कोंडी असते. त्यामुळे आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडण्याची भीती वाटते. ट्रफिक जाममुळे टॅक्सीवालेही रुग्णालयात यायला तयार होत नाहीत. – प्रदीप मयेकर, ज्येष्ठ नागरिक, दादर
जपान, चीनमध्ये एखादा रेल्वे ब्रिज तोडण्यापूर्वी त्यामुळे काय परिणाम होतील याचा अभ्यास करून उपाययोजना केल्या जातात. मात्र आपल्याकडे ही कामे वेळेत होत नाहीत. गोखलेसह अनेक पूल सध्या अपूर्ण आहेत. पुलाचे काम नियोजनानुसार आणि वेळेतच व्हायला हवे. – ए. व्ही. शेणॉय, वाहतूक तज्ञ
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List