आम्ही पक्ष फोडतो त्यातून धडा घ्या… विद्यार्थी फोडा आणि शाळा चालवा! गुलाबरावांना वैचारिक ‘जुलाब’
पुरेशा पटसंख्येअभावी शाळा बंद करण्याची वेळ आलेली असताना शिक्षकांनी नुसते हातावर हात धरून बसू नये. आम्ही पक्ष फोडतो, त्यातून धडा घ्या! विद्यार्थी फोडो आणि शाळा चालवा, असा अजब सल्ला जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांना दिला आहे.
जळगावमध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत विजेत्या शाळांचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या वेळी पालकमंत्री गुलावराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील घटत्या विद्यार्थी संख्येवरून चिंता व्यक्त करत, पटसंख्या वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली. मात्र ही अपेक्षा व्यक्त करताना आम्ही ज्या पद्धतीने पक्षातील लोक फोडतो, त्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे, असे विधान त्यांनी केले.
आयुष्यात आपण यापूर्वी बऱ्याच लोकांना त्रास दिला. मात्र शिक्षकाला कधीच त्रास दिला नाही. कारण शिक्षकांबद्दल आमच्या मनामध्ये एक वेगळे स्थान आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, गुलाबरावांनी केलेल्या या जुलाबी वक्तव्यावरून टीका होऊ लागताच गुलाबराव पाटील यांनी मी विनोदाने बोललो. आम्ही ज्या पद्धतीने पक्षातील कार्यकर्ते पक्षात घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच पद्धतीने शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या बाबतीत करावे, असे मला म्हणायचे होते अशी सारवासारव केली आहे. मात्र मंत्रीपदी असणाऱ्या गुलाबरावांच्या वक्तव्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांच्या मागेही ईडी लावणार का? – रोहित पवार
आता विद्यार्थी फुटले नाही तर त्यांच्या मागेही ईडी, सीबीआय, आयटीचा ससेमिरा लावतात की काय, याची भीती वाटतेय अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गुलाबरावांवर हल्ला चढवला आहे. मंत्री महोदय, विद्यार्थी फोडोफोडीपेक्षा सरकारी शाळांमध्ये पुरेशा सुविधा आणि शाळांची गुणवत्ता सुधारा. शाळांसमोर रांगा लागतील, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List