तामीळनाडूच्या राज्यपालांनी विद्यार्थ्यांना ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्यायला लावल्या
राज्य सरकारची तब्बल दहा विधेयके रोखून धरण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने तामीळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांना फटकारले असताना आता राज्यपाल आणखी एका नव्या वादात अडकले आहेत. मदुराई येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सांगितले. यावरून आता द्रमुक नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यपाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते असल्यासारखे वागत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
राज्यपालांच्या आवाहनाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. आज आपण प्रभू श्रीरामच्या महान भक्ताला वंदन करूयात आणि त्यांच्या सन्मानार्थ जय श्रीरामाच्या घोषणा देऊयात, असे राज्यपाल म्हणाले. पंब रामायण लिहिणाऱया एका प्राचीन कवीचा उल्लेख करत त्यांनी त्या कवीच्या सन्मानार्थ विद्यार्थ्यांनी जय श्रीराम म्हणावे असे आवाहन केले.
राज्यपालांची कृती ही देशाच्या धर्मनिरपेक्ष विचारांच्या विरोधात आहे. राज्यपाल वारंवार संविधानाचे उल्लंघन का करत आहेत? त्यांनी अद्याप राजीनामा का दिलेला नाही? त्यांनी देशाच्या संघरचनेचे उल्लंघन केले असून त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना झापले आहे, असे द्रमुकचे प्रवक्ते धरणीधरन म्हणाले, तर राज्यपाल धर्मगुरूंप्रमाणे बोलत असून धार्मिक विचारांना खतपाणी घालत आहेत. देशात विविध धर्म, भाषा आणि पंथ आहेत. तरीही राज्यपाल विद्यार्थ्यांना जय श्रीरामच्या घोषणा द्यायला सांगून विषमतेला प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप काँगेसचे आमदार असन मौलाना यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List