Dr Babasaheb Ambedkar Jayanti – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी, राजगृहावर आज अनुयायांची उसळणार गर्दी
हिंदुस्थानी राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त सोमवार, 14 एप्रिलला दादरच्या चैत्यभूमी आणि बाबासाहेबांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर त्यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी उसळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेकडून चोख व्यवस्था करण्यात आली असून सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. दरम्यान, चैत्यभूमीवर जाऊन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री सकाळी 9.30 वाजता पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करणार आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादरच्या चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातून अनुयायी येतात. या पार्श्वभूमीवर, विविध प्रकारच्या नागरी सोयीसुविधा पुरवण्याच्या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासकभूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. उपआयुक्त (परिमंडळ 2) प्रशांत सपकाळे, जी- उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांच्या देखरेखीखाली कार्यवाही करण्यात आली आहे.
पाणी, शौचालय, वैद्यकीय सेवा, सीसीटीव्ही तैनात
चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक तसेच परिसरामध्ये नियंत्रण कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, शौचालये आदी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच सीसीटीव्ही, चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी, अग्निशमन दलाचे पथक तैनात करण्यात आले आहे. वैद्यकीय सुविधेसाठी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी नेमण्यात आले आहेत. आणीबाणीच्या प्रसंगासाठी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली आहे.
चेंबूरमध्ये महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला शेवंता, ऑर्किड, झेंडू यासह विविध फुलांची सजावट करण्यात आली असून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
बाबासाहेबांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन
चैत्यभूमी येथे 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन महापालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे करण्यात आले आहे. या प्रदर्शन दालनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासातील दुर्मिळ छायाचित्रे आहेत. त्याचबरोबर या प्रदर्शन दालनात, संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक जीवनचरित्रावर आधारित कॉफी टेबल बुकदेखील विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे.
जयंतीनिमित्त थेट प्रक्षेपण
दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे महापालिकेच्या यूटय़ूब या समाजमाध्यम खात्यावरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे तसेच फेसबुक, एक्स या माध्यमांवरून सहप्रक्षेपण करण्यात येणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List