बिहारहून मजुरीसाठी आलेल्या तरुणाचा 5 वर्षीय मुलीवर बलात्काराचा प्रयत्न, गळा दाबून हत्या; पोलीस चकमकीमध्ये आरोपी ठार
बिहारमधून मजुरीसाठी आलेल्या एका तरुणाने 5 वर्षीय मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा केल्याने त्याने तिचा गळा दाबून खून केला. रितेश कुमार (वय – 35) असे तरुणाचे नाव असून पोलीस चकमकीमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमधील हुबळी येथील ही घटना आहे.
आरोपी रितेश कुमार याने एका 5 वर्षीय मुलीला शेडमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या लोकांनी शेडकडे धाव घेतली. पकडले जाऊ या भीतीने आरोपीने मुलीचा गळा दाबला आणि तिचा खून करून तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे धाव घेतली.
पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यात आरोपी पीडित मुलीला घरासमोर खेळत असताना उचलून घेऊन जाताना दिसतो. पुरावा हाती येताच पोलिसांनी आरोपीविरोधात पॉस्को कायदा आणि भादवि कलमांतर्गत गुन्हा दाखल करत त्याच्या तपासासाठी पथक रवाना केले.
आरोपीचा ठावठिकाणा लागल्यानंतर पोलीस त्याला पकडण्यासाठी दाखल झाले. मात्र आरोपी रितेशने पोलिसांना पाहताच त्यांच्यावर दगडफेक केली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. महिला पोलीस उप निरीक्षक अन्नपूर्णा यांनी हवेत गोळी झाडत त्याला थांबण्याचा इशारा केला. त्यानंतरही आरोपी न थांबल्याने पोलिसांनी दोन-तीन राउंड फायर केले. यातील एक गोळी आरोपीच्या पायाला आणि दुसरी त्याच्या पाठीत घुसली. या चकमकीत जखमी झालेल्या आरोपीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, अशी माहिती पोलीस आयुक्त शशी कुमार यांनी दिली. आरोपीच्या हल्ल्यात महिला पोलीस उप निरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, आरोपी रितेश हा बिहारमधील पाटणा येथील रहिवासी होता. गेल्या तीन महिन्यांपासून तो हुबळी येथे राहत होता. मजुरी करून तो आपले पोट भर होता. जखमी अवस्थेत रुग्णालयात नेताना त्यांनी आपला गुन्हाही कबूल केला होता, असेही पोलिसांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List