निमित्त- बुडती हे जन न देखवे डोळा

निमित्त- बुडती हे जन न देखवे डोळा

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

प्रतिवर्षी 14 एप्रिल हा दिवस महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणून अत्यंत मोठय़ा प्रमाणात उत्कट उत्साहाने साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेबांच्या कार्यात कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा भक्कम पाठिंबा व सहकार्य याचा मोठा वाटा होता, हे मान्यच करावे लागेल.

कोल्हापुरात आपल्या संस्थानात राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी स्वतपासून जी कृतिशील चळवळ उभी केली होती, त्यामध्ये दत्तोबा संतराम पोवार हे एक सुशिक्षित अस्पृश्य तरुण सहभागी झाले होते. ते महाराजांचे निष्ठावंत सहकारी होते. त्यांनी 1917 सालीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी परिचय करून घेतला होता. याच दत्तोबा संतराम पोवारांकडून डॉ. बाबासाहेबांबद्दल संपूर्ण माहिती राजर्षी शाहू महाराजांच्या कानावर आली होती. अस्पृश्य समाजातून एखादा तरुण शिक्षण घेऊन दलितांच्या प्रश्नांवर आपली वाणी, लेखणी व बुद्धिचातुर्य वापरून त्यांच्या उद्धारासाठी झटतो आहे हे ऐकून शाहू महाराज मनातून फारच सुखावले होते. त्यातूनच त्यांना डॉ. बाबासाहेबांची भेट व्हावी असे वाटू लागले होते. उभयतांच्या भेटीसाठी 1919 साल उजाडावे लागले. 1919 साली शाहू महाराज मुंबईला गेले होते, तेथील पन्हाळा लॉजवर त्यांचा मुक्काम होता. त्या वेळी शाहू महाराज स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर राहत होते त्या परळच्या चाळीत गेले.  शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब यांच्या या पहिल्या भेटीतच उभयतांना मनापासून आनंद झाला. या पहिल्या भेटीतच शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूर भेटीचे निमंत्रण दिले आणि बाबासाहेबांनीही ते स्वीकारले.

डॉ. बाबासाहेबांची कोल्हापूरला भेट

मुंबई भेटीत ‘पन्हाळा लॉज’वर ठरल्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब कोल्हापूरला आले होते. कोल्हापूर रेल्वे स्टेशनच्या समोर असलेल्या तत्कालीन सरकारी विश्रामगृहात त्यांचे वास्तव्य होते. या वेळी शाहू महाराजांनी त्यांची कोल्हापूर शहरातून बग्गीत बसवून मिरवणूक काढली होती. राजेशाही इतमामात त्यांचे स्वागत करण्यात आले होते. सोनतळी कॅम्पवर शाहू महाराजांनी खास शाही भोजनाचा बेत आखून स्वतः डॉ. बाबासाहेबांबरोबर भोजन केले होते. अर्थात तत्कालीन सनातनी विचारांच्या व्यक्तींना राजर्षींनी दिलेली ही सणसणीत चपराकच होती, तर स्वकीयांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचाच हा त्यांचा प्रयत्न होता. तत्पूर्वी टाऊन हॉलजवळ गंगाराम कांबळे या अस्पृश्य समाजातील व्यक्तीला हॉटेल घालून देऊन त्याच हॉटेलमध्ये स्वतःसह आपल्या सरदार व हुजऱयांसह दररोज तेथे चहा पिऊन त्यांनी मोठा गहबज माजविला होताच. ही गोष्ट आजच्या काळात फार महत्त्वाची वाटत नसली तरी स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्थानी राजवट लक्षात घेतली तर या गोष्टीचे महत्त्व व शाहू महाराजांनी दाखवलेलं धारिष्टय़ लक्षात येईल.

कोल्हापुरात शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेबांशी प्रदीर्घ चर्चा केली, मुंबईला परत जाताना त्यांनी एक देखणा निरोप समारंभ आयोजित करून त्यांचा जाहीर सत्कारही केला. या वेळी डॉ. बाबासाहेब म्हणाले, “छत्रपतींनी दिलेला मानाचा जरीपटका माझ्या मस्तकी चढविला आहे. त्याचा मी सदैव मान राखीन.’’ डॉ. बाबासाहेबांचे उपरोक्त उद्गार खूपच अर्थपूर्ण होते.

‘मूकनायक’ पत्रास शाहू महाराजांचे सहाय्य

कोल्हापूर भेटीनंतर डॉ. बाबासाहेब नव्या उमेदीने व उत्साहाने कामास लागले. भारत दौऱयावर आलेल्या साऊथ ब्युरो समितीसमोर मांडण्यासाठी व अस्पृश्यांची बाजू जनतेसमोर मांडण्यासाठी त्यांना वर्तमानपत्राची गरज भासू लागली होती. डॉ. बाबासाहेबांच्या विश्वासू सहकाऱयांनी महाराजांची मुंबई मुक्कामी खास भेट घेऊन डॉ. बाबासाहेबांची वर्तमानपत्र काढण्याची योजना त्यांच्या कानावर घातली. शाहू महाराजांनी शांतपणे ऐकून घेऊन तत्काळ वर्तमानपत्र काढण्यासाठी डॉ. बाबासाहेबांना रुपये अडीच हजारांचा चेक दिला. या महाराजांच्या उदार आर्थिक मदतीतूनच ‘मूकनायक’ या पाक्षिकाचा जन्म झाला.

माणगाव परिषद 

कोल्हापूर संस्थानातील कागल जहांगिरीतील ‘माणगाव’ या गावी दि. 20 व 21 मार्च 1920 रोजी दक्षिण महाराष्ट्र सचिव परिषदेचे पहिले अधिवेशन भरविण्यात आले होते. हे अधिवेशन म्हणजेच ऐतिहासिक ‘माणगाव परिषद’ होय. यावेळी बाबासाहेबांची राहण्याची सोय राजर्षी शाहू महाराजांच्या गेस्ट हाऊसमध्ये केली होती. ‘माणगाव परिषद’ म्हणजे डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील पहिलाच भव्य आणि जाहीर कार्यक्रम होता व त्या परिषदेला शाहू महाराजांची उपस्थिती ही एक ऐतिहासिक महत्त्वाची घटना होती. या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी केलेले भाषण डॉ. बाबासाहेबांसह तमाम अस्पृश्य जनतेचे मनोधैर्य वाढविणारे होते. ही परिषद म्हणजे डॉ. बाबासाहेबांच्या सार्वजनिक कार्याची सुरुवात होती आणि आरंभालाच शाहू महाराजांसारखा खंबीर आधार त्यांना मिळाला होता. पुढे नागपूरला अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची परिषद 30, 31 मे आणि 1 जून 1920 हे तीन दिवस शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली मोठय़ा उत्साहाने संपन्न झाली, त्या परिषदेच्या यशस्वीतेचे सर्व श्रेय राजर्षी शाहू महाराज यांनाच द्यावे लागले.

नागपूर परिषद

अस्पृश्यांच्या राजकीय आकांक्षा काय आहेत याचा जाहीर खुलासा डॉ. बाबासाहेबांनी एका भाषणात केला होता. मात्र अगोदर शाहू महाराजांनी अस्पृश्यांच्या मुक्तीची चळवळ उभी करून दलितोद्धाराची मशाल चेतविली होती. नंतर हीच मशाल डॉ. बाबासाहेबांनी आपल्या हातात घेतली होती. शाहू महाराजांच्या संकल्पनेतील अस्पृश्यांच्या उद्धारासाठी पुढे डॉ. बाबासाहेबांनी आपले अवघे आयुष्य वेचले आणि पुढील प्रत्येक क्षणी शाहू महाराजांचे ऋण मान्य करण्यात त्यांनी स्वतःला धन्य मानून घेतले. शाहू महाराज जर पुढे आणखी काही वर्षे जगले असते तर दोघांच्या अस्पृश्योद्धाराच्या चळवळीचे आणखी वेगळे चित्र जगाच्या नकाशावर गडद व अधोरेखित झाले असते.

तुकोबारायांच्या विचारांचे अनुयायी

‘बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणुनिया’ या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगोक्तीप्रमाणे दीनदलितांच्या उद्धारासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे राजर्षी शाहू महाराजांनी भक्कम पाठिंबा व आधार दिला होता. खरे तर संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या विचार व आचाराचे डॉ. बाबासाहेब व राजर्षी शाहू महाराज हे दोघेही उत्तरदायित्व ठरतात.

[email protected]

(लेखक मानसशास्त्र व लोककलेचे अभ्यासक आहेत.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई इंडियन्सने रोखला दिल्ली कॅपिटल्सचा विजयरथ, 12 धावांनी जिंकला सामना मुंबई इंडियन्सने रोखला दिल्ली कॅपिटल्सचा विजयरथ, 12 धावांनी जिंकला सामना
मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी...
प्रँक करण्याच्या नादात नको ते करुन बसले, मित्रांमुळे तरुणाने प्राण गमावले
खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो… प्रेमी युगुलाची अश्लील कृत्य व्हिडिओत कैद
परदेशी नागरिकांना अमेरिकेचा अल्टिमेटम, 30 दिवसांपेक्षा जास्त काळ राहायचे असेल तर, नोंदणी करा, अन्यथा…
‘मनसे भाजपची बी टीम त्यांची….’; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं, कुठे-कुठे पाऊस? वाचा एका क्लिकवर
कानफटातच लगावेन… Homosexuality बाबत विचारताच प्रसिद्ध अभिनेत्री भडकली; पारा पाहून सन्नाटा