मी कधीही उपोषण करायला मोकळा! छगन भुजबळ यांची नाराजी अजूनही कायम
जे मंत्री, पालकमंत्री या ठिकाणी आहेत, त्यांना विचारायला हवे की, या गोष्टीसाठी आंदोलन का करावे लागत आहे? मी फक्त सरकारमधील घटक पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे मी उपोषण करायला मोकळा आहे, असे सांगत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीनंतर करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आलेले नाही, तेव्हापासून भुजबळ नाराज आहेत. आज महात्मा फुलेवाड्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी छगन भुजबळ पुण्यामध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले, जेव्हापासून महात्मा फुलेवाडा देशाला अर्पण करण्यात आला आहे, तेव्हापासून आणि त्यापूर्वीपासून अनेक लोक याठिकाणी येतात. याठिकाणी सभा घेण्यासाठी जागा नाही. अनेक वर्षे जागा मिळावी, यासाठी प्रयत्न करीत आहे. हे 100 ते 200 कोटींचे काम आहे. यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करूनदेखील प्रयत्नांना यश मिळत नाही.
इतर ठिकाणी ज्या पद्धतीने जमीन अधिग्रहण केले जाते, त्या पद्धतीने या जागेचे अधिग्रहण केले जात नाही. जागा ताब्यात घेण्याचा या ठिकाणचा वेग शून्य आहे. जमीन अधिग्रहणाबाबत पालिकेचे अधिकारी नुसती टोलवाटोलवी करत आहेत. यामध्ये प्रगती न झाल्यास आंदोलन करण्याची वेळ येईल, असादेखील इशारा छगन भुजबळ यांनी दिला.
सरकारमध्ये असतानादेखील फुलेवाड्याच्या कामासाठी आंदोलन का करावे लागते, या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले, या गोष्टी सरकारला विचारायला हव्यात. या ठिकाणी जे मंत्री, पालकमंत्री आहेत, त्यांना विचारायला हवं की, या गोष्टीसाठी आंदोलन का करावे लागत आहे? मी फक्त सरकारमधील घटक पक्षाचा आमदार आहे, त्यामुळे मी उपोषण करायला मोकळा आहे. बाकीच्या जबाबदाऱ्या असल्या तरी थोडीशी अडचण होते, अशी खोचक प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.
महात्मा फुले यांच्यावर आधारित हिंदी चित्रपट येत आहे. यावर काहींनी आक्षेप घेतला आहे. महात्मा फुले यांच्याबाबत मराठीमध्ये चित्रपट आले असले, तरी हा पहिला हिंदी चित्रपट आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी माझी भेट घेतली, त्यावेळेस अनेक पुस्तकांचा विचार करून चित्रपट बनवला आहे. कोणतीही लिबर्टी चित्रपट बनवताना घेतली नाही. एखाद्या गोष्टीबाबत आक्षेप असेल तर आम्ही पुरावे देऊ शकतो, असे भुजबळ म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List