मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसांची NIA कोठडी, मध्यरात्री अडीच वाजता झाली सुनावणी
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाची (वय – 64) एनआयए कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टात मध्यरात्री अडीचच्या सुमारास याबाबत सुनावणी पार पडली. यावेळी न्यायाधीश चंदेर जित सिंह यांनी तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली. कोठडीत आता राणाची कसून चौकशी केली जाणार असून यातून अनेक मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.
राणाला अमेरिकेतून दिल्लीत सुपर मिड-साईज बिझनेस जेट विमानाने आणण्यात आले. हे विशेष विमान व्हिएन्ना येथील एयरक्राफ्ट चार्टर सर्व्हीसकडून भाड्याने घेण्यात आले होते. विमान बुधवारी पहाटे 2 वाजून 15 मिनिटांनी मियामीमधून उडाले. त्यानंतर रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथे त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता पोहोचले. जवळपास 11 तासांची विश्रांती घेतल्यानंतर विमानाने पहाटे 6 वाजून 15 मिनिटांनी दिल्लीसाठी उड्डाण घेतले आणि सायंकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी विमान दिल्लीतील पालम विमानतळावर पोहोचले.
यानंतर एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने राणाला तत्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास राणाला घेऊन एनआयएच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांचा ताफा दाखल झाला. त्यानंतर त्याला पटियाळा कोर्टामध्ये हजर करण्यात आले. एनआयएने कोर्टाकडे 20 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र कोर्टाने 18 दिवसांची कोठडी सुनावली.
#WATCH | Delhi: 26/11 Mumbai attacks accused Tahawwur Rana brought to National Investigation Agency headquarters
Rana will remain in NIA custody for 18 days, during which time the agency will question him in detail in order to unravel the complete conspiracy behind the deadly… pic.twitter.com/8mUKEEN7kz
— ANI (@ANI) April 10, 2025
मुंबईसह आग्रा, दिल्ली, कोची, अहमदाबाद येथेही तहव्वूर राणाने पत्नी समराज राणा अख्तरसह भेटी दिल्या होत्या. 13 ते 21 नोव्हेंबर 2008 दरम्यान या दोघांनी विविध ठिकाणांची रेकी केली होती. त्यानंतर दहशतवादी हल्ल्यांचा कट रचण्यात आला होता व 26 नोव्हेंबरला मुंबईवर हल्ला झाला होता. याबाबत आता राणाच्या चौकशीतूनच अधिक माहिती उघड होणार आहे. दरम्यान, राणा पाकिस्तानच्या आयएसआयच्या संपर्कात होता. त्यामुळे त्याच्या चौकशीत दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानचा बुरखाही टराटरा फाडला जाणार आहे. हेडलीविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात साक्षीदाराच्या जबाबाचा समावेश असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. मुंबईवरील हल्ल्यात दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस आणि लिओपोल्ड कॅफे या ठिकाणांना लक्ष्य केले होते.
दहशतवादी हल्ला मुंबईत, राणाचा ताबा एनआयएकडे
तहव्वूर राणाचा ताबा मुंबई पोलिसांऐवजी एनआयएकडे का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याचे एक कारण म्हणजे मुंबईवरील हल्ल्यांचे आरोपपत्र 2009 साली सादर झाले तेव्हा त्यात राणाचा फरार आरोपी म्हणून उल्लेख नव्हता. याउलट 2011मध्ये एनआयएने त्याचा आपल्या आरोपपत्रात प्रथम उल्लेख केला होता. या प्रकरणात 2009मध्ये एनआयएने दिल्लीच्या न्यायालयात पहिले आरोपपत्र दाखल केले होते. यात सात पाकिस्तानी नागरिकांसह दोघांवर खून, कट आणि राष्ट्राविरोधात युद्ध पुकारण्याचा आरोप होता. पुढे अमेरिकेत जाऊन एनआयएने राणाची चौकशीही केली. कटाच्या कारस्थानात मुंबईवरील हल्ल्यांचाही समावेश होता. त्या वेळी राणाच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्याची पहिली मागणी एनआयएने केली. 2023 साली राणाच्या प्रत्यार्पणाची चर्चा सुरू झाली तेव्हा कुठे मुंबईवरील हल्ल्याच्या केसमध्ये राणाचा उल्लेख फरारी आरोपी म्हणून करण्यात आला.
दयान कृष्णन करणार युक्तिवाद
तहव्वूर राणा याच्याविरोधात एनआयएच्या विशेष न्यायालयात राणाला कठोरात कठोर शिक्षा मिळण्यासाठी युक्तिवाद करणार आहेत. राणाचे अमेरिकेतून हिंदुस्थानात प्रत्यार्पण करण्यासाठी कृष्णन यांनीच महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2010 पासून राणाचे हिंदुस्थानकडे प्रत्यार्पण करण्याच्या कार्यवाहीशी जोडले गेले. राणाला कठोर शिक्षा मिळण्यासाठी दयान कृष्णन यांना विशेष सरकारी वकील नरेंद्र मान यांची साथ मिळणार आहे. केंद्र सरकारने त्यांची नियुक्ती केली असून मान हे अनुभवी वकील आहेत.
भक्कम पुरावे, खटला चालणार
राणाविरोधात भक्कम पुरावे असून त्याच्यावर खटला चालणार आहे. त्याची कसून चौकशी होणार असून त्यात हल्ल्यातील पाकिस्तानचा सहभाग, डेव्हिड कोलमन हेडलीने आणि राणाने कशा प्रकारे मुंबईतील विविध ठिकाणची रेकी केली, मुंबईतील गर्दीच्या ठिकाणांबाबत केलेली चर्चा आणि रचलेला कट इत्यादींबाबतची माहिती समोर येणार आहे. याच ठिकाणांचा उल्लेख डेव्हिड हेडलीच्या संभाषणातही असून पुढे त्या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे समोर आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List