संघर्ष, ओम साई, जगदंबची विजयी सलामी; आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे जोरदार उद्घाटन
शिवसेना-युवासेना दिंडोशी विधानसभा पुरस्कृत गोकुळवन मित्र मंडळ आयोजित आमदार चषक कबड्डी स्पर्धेत संघर्ष, ओम साई, जगदंब आणि नेताजी सुभाष या मंडळांनी दमदार विजयासह सलामी दिली.
दिंडोशीतील गोकुळवन मित्रमंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आमदार चषक द्वितीय श्रेणी पुरुष गट कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी जोगेश्वरीचे आमदार बाळा नर, उपनेते अमोल कीर्तिकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, विभाग संघटक प्रशांत कदम, उपविभागप्रमुख भाई परब, माजी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे, शाखाप्रमुख संपत मोरे, संदीप जाधव उपस्थित होते. 32 संघांचा समावेश असलेल्या या तीनदिवसीय स्पर्धेच्या उद्घाटनीय दिवशी जगदंब मंडळाने पार्ले क्रीडा केंद्राचा 32-14 असा धुव्वा उडवत दणदणीत सलामी दिली. बोरिवलीच्या ओम साई मंडळाने स्वयंभू क्रीडा मंडळाचाही 30-10 असा फडशा पाडला. मालाडच्या नेताजी सुभाष संघाने पार्ल्याच्या गुरू गजानन मंडळाचाही 33-10 असा सहज पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळवले. साऱया लढतीत एकतर्फी होत असताना संघर्ष आणि युवा क्रीडा मंडळामध्ये झालेल्या लढतीत कबड्डीप्रेमींना काहीसा दिलासा मिळाला. संघर्षने 7-5 अशी आघाडी घेत सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला. मग दुसऱया डावातही संघर्षने जोरदार चढाया करत आपली आघाडी कायम ठेवली आणि 25-17 अशा फरकाने सामना आपल्या खिशात टाकला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List