“व्हॅनिटी व्हॅनमध्ये कपडे बदलताना अचानक दिग्दर्शक आला अन्..”; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग
‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री शालिनी पांडेनं ‘महाराज’ आणि ‘डब्बा कार्टल’ यांसारख्या चित्रपटांमधून विशेष छाप सोडली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शालिनीने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. सेटवरील व्हॅनिटी व्हॅनमध्ये कपडे बदलत असताना अचानक एक दाक्षिणात्य दिग्दर्शक आतमध्ये शिरल्याचा खुलासा तिने केला. त्यावेळी शालिनी या इंडस्ट्रीत नवीनच होती. या घटनेनंतर जेव्हा ती दिग्दर्शकांवर ओरडली, तेव्हा तिच्या ओरडण्यावरूनही काही लोकांनी तिला सुनावल्याचं शालिनीने सांगितलं.
‘फिल्मीज्ञान’ला दिलेल्या मुलाखतीत शालिनी म्हणाली, “मी नेहमी चांगल्या पुरुषांसोबत काम केलं नाही. मी ऑनस्क्रीन, ऑफस्क्रीन आणि क्रूसोबतच्या काही भयानक पुरुषांसोबत काम केलंय. परंतु तुम्हाला फक्त तुमची मर्यादा निश्चित करावी लागते. माझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये मी अत्यंत वाईट पुरुषांचा सामना केला आहे आणि ही खरी गोष्ट आहे.”
इंडस्ट्रीतील संघर्षाविषयी बोलताना शालिनीने पुढे सांगितलं, “माझं फिल्मी बॅकग्राऊंड नाहीये, म्हणून सुरुवातीला मला काही गोष्टी सांभाळता आल्या नाहीत. माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी एका दाक्षिणात्य चित्रपटात काम करत होते. तेव्हा सेटवर एकेदिवशी चित्रपटाचा दिग्दर्शक दरवाजा न ठोठावताच थेट व्हॅनिटी व्हॅनमध्ये आला होता. त्यावेळी मी कपडे बदलत होती. त्यांना पाहताच मी पूर्णपणे घाबरून गेले होते. परंतु नंतर मी त्यांच्यावर खूप ओरडले. असं काही घडू शकतं याचा मी विचारच केला नव्हता.” त्यावेळी शालिनी 22 वर्षांची होती.
“मला त्यावेळी अनेकांनी म्हटलं होतं की दिग्दर्शकावर तू अशा पद्धतीने ओरडायला नाही पाहिजे. मात्र ही काही पद्धत नसते. तुम्ही दार न ठोठावता आत येऊ शकत नाही. तुम्ही माझ्यासोबत असं वागू शकत नाही. माझी प्रतिक्रिया पाहून तुम्हाला कदाचित मी तापट स्वभावाची आहे, असं वाटलं असेल. परंतु स्वत:च्या सुरक्षेसाठी मला तसं वागावं लागलं. नंतर मी हळूहळू अशा परिस्थितींना कसं सामोरं जायचं हे शिकत गेली”, असं ती म्हणाली.
शालिनीने ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटात अभिनेता विजय देवरकोंडासोबत मुख्य भूमिका साकारली होती. हा मूळ तेलुगू चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. त्यानंतर त्याचा हिंदी रिमेक ‘कबीर सिंग’ बनवण्यात आला. ज्यामध्ये शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List