नवी मुंबईत सिडकोचा बुलडोझर सुपरफास्ट, खारघरमध्ये 100 घरांचा बेकायदा टॉवर जमीनदोस्त
नवी मुंबई शहरात अनधिकृत बांधकामांची बजबजपुरी वाढल्यानंतर सिडकोचा तोडफोड बुलडोझर आता सुपरफास्ट निघाला आहे. सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने आज सकाळी खारघर येथील सेक्टर 5 मध्ये एका बेकायदा टॉवरवर हातोडा चालवला. 100 घरे असलेली ही इमारत जमीनदोस्त केली. या कारवाईसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात ठेवण्यात आला होता. सिडकोच्या या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत इमले उभे करणाऱ्या बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत.
खारघर येथील सेक्टर 5 मधील 36 के क्रमांकाचा भूखंड सार्वजनिक उपक्रमासाठी राखीव ठेवलेला आहे. हाच भूखंड भूमाफियांनी हडप करून तिथे सहा मजल्यांचा अनधिकृत टॉवर उभा केला होता. या टॉवरमध्ये सुमारे 100 घरे होती. याच टॉवरवर आणखी दोन मजले चढवण्याचे कामही बिल्डरने सुरू केले होते. याबाबतची माहिती सिडकोच्या अतिक्रमणविरोधी विभागाला मिळाल्यानंतर व्हिल व्ह्यू ही अनधिकृत इमारत हटवण्यासाठी संबंधित बिल्डरला नोटीस देण्यात आली. मात्र बिल्डरने हा अनधिकृत इमला न हटवल्यामुळे सिडकोने मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या बांधकामांवर हातोडा चालवला.
अनधिकृत बांधकामांचा वेग कमी झाला
नवी मुंबई शहरात सिडको आणि महापालिका प्राधिकरणांनी कारवाईचा धडाका सुरू केल्यामुळे अनधिकृत बाधकामांचा वेग कमी झाला आहे. खारघर येथे आज झालेल्या कारवाईनंतर सिडकोचा कोट्यवधी रुपयांचा भूखंड मोकळा झाला आहे. संबंधित बांधकामधारकाला यापूर्वी नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही त्याने बांधकाम हटवले नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. हा कारवाईचा धडाका सुरूच राहणार आहे, असा इशारा यावेळी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी दिलाअधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा व्हिल व्ह्यू ही अनधिकृत इमारत हटवण्यासाठी सिडकोच्या अतिक्रमण विभागाने एक हाय रिच बूम मशीन, एक जेसीबी, एक गॅस कटर आणि तीन पोकलेनचा वापर केला. या कारवाईमध्ये सहा अधिकारी, चार सिडको पोलीस अधिकारी, 24 सिडको पोलीस, 27 सुरक्षारक्षक, नऊ सुरक्षा बलाचे कर्मचारी आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे 60 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते. पोकलेनचा एक फटका मारल्यानंतर इमारतीचा पूर्ण मजलाच खाली येत होता. या अनधिकृत बांधकामावर यापूर्वी कारवाई झाली होती. मात्र बिल्डर आणि भूमाफियांनी अनेक पळवाटा शोधून पुन्हा हे अर्धवट बांधकाम पूर्ण केले. मात्र सिडकोने आज या बांधकामांवर हातोडा मारला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List