सामना अग्रलेख – अमृत आणि हलाहल!

सामना अग्रलेख – अमृत आणि हलाहल!

परस्पर संबंधांनी अमृतमहोत्सवी पल्ला गाठला म्हणून चीन भारताविषयीचे परंपरागत शत्रुत्व सोडून देईल, गिळंकृत केलेला लडाखमधील भूभाग हसत हसत भारताच्या हवाली करेल, अरुणाचल प्रदेशवरील हक्काचा त्याग करेल, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आदी आपल्या शेजारी देशांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्यावर नेम धरणार नाही, असे अजिबात होणार नाही. भारत-चीन संबंध चीनसाठी ‘अमृत’ ठरले आहेत आणि भारतासाठी मात्र ते ‘हलाहल’च राहिले आहे. संबंधांच्या पंचाहत्तरीनिमित्त चिनी राष्ट्राध्यक्षांनी भारताला ‘हत्ती’ संबोधले म्हणून हुरळून गेलेल्या मोदीभक्तांना हे कोणी सांगायचे?

कुठल्याही दोन देशांमधील राजनैतिक संबंध म्हणजे ‘चेहरे आणि मुखवटे’ हाच खेळ असतो. त्यातही भारत आणि चीन यांच्यातील संबंध तर या प्रयोगाचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. या प्रयोगांनी आता म्हणे पंचाहत्तरी गाठली आहे. थोडक्यात, भारत-चीन राजनैतिक संबंधांना ‘अमृतमहोत्सवी’ झालर लागली आहे. त्यानिमित्ताने दोन्ही देशांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छांमध्ये ‘भारत-चीन संबंधांचा विकास बहुध्रुवीय जग साकारण्यासाठी कसा अनुकूल आहे’, असे म्हटले आहे. तिकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ‘दोन्ही देशांच्या हितसंबंधांची जपणूक व्हावी’ अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जिनपिंग साहेबांनी व्यक्त केलेली ही अपेक्षा गोडगुलाबी असली तरी गेली 75 वर्षे अशी जपणूक करायला त्यांच्या देशाला कोणी रोखले होते? गळाभेटी घेतानाच भारताचा गळा कसा कापायचा, याचाच विचार आजवरच्या चिनी राज्यकर्त्यांनी केला. आता परस्पर संबंधांनी पंचाहत्तरी गाठली म्हणून ‘ड्रगन’चा थुईथुई नाचणारा मोर होईल, असे समजायचे कारण नाही. खरे म्हणजे दोन देशांमधील राजनैतिक संबंध अमृत महोत्सवाचा पल्ला गाठतात, तेव्हा तो ऐतिहासिक टप्पा असतो. मागील सर्व समज-गैरसमज आणि शह-प्रतिशह कमी करून परस्परांच्या जवळ येण्याची,

कटुता कमी करण्याची

ती एक संधी असते. जर भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध जपले जावेत, असे चिनी राष्ट्राध्यक्षांना खरंच वाटत असेल तर या पंचाहत्तरीच्या निमित्ताने त्यांनी काहीतरी सकारात्मक पाऊल टाकले पाहिजे. ड्रगनने आपली चाल बदलली आहे, हे भारतीय जनतेला दिसले पाहिजे, परंतु मोदी सरकारचे ‘भारत बदल रहा है,’ हे गाणे जसे खोटे आहे तसेच जिनपिंग यांचे ‘चीन बदल रहा है’चे नाणेही खोटे आहे. आता म्हणे, चिनी राष्ट्राध्यक्षांनी भारत-चीन संबंधांना ड्रगन आणि हत्ती यांच्यातील ‘टँगो’ नृत्याची उपमा दिली आहे. म्हणजे कालपर्यंत ‘हत्ती’वर फूत्कार सोडणारा ‘ड्रगन’ आता ‘हत्ती’सोबत म्हणजे भारतासोबत खरोखर ‘टँगो’ नृत्य करताना दिसेल अशी दिवास्वप्ने मोदीभक्त पाहू लागले आहेत. मात्र तसे होणार नाही आणि चीनच्या भारतविरोधी कुरापती आणि उचापती 76 व्या वर्षातही सुरूच राहील. मुळात पूर्वानुभव पाहता चिनी राष्ट्राध्यक्षांचा टँगो नृत्याचा कल्पनाविलास प्रत्यक्षात येण्याची सुतराम शक्यता नाही. भारत-चीन संबंधांना अमृतमहोत्सवी झालर लागो नाहीतर शताब्दीची, ना चिनी राज्यकर्त्यांचा ‘चेहरे आणि मुखवटे’ हा प्रयोग थांबेल ना भारतविरोधी उद्योग थांबतील. बदलणाऱया जागतिक आणि भूराजकीय परिस्थितीत चीनला भारताबाबतचा परंपरागत दृष्टिकोन बदलावा लागेल, असे सांगितले जात आहे. मात्र चिनी ड्रगन भारतीय हत्तीसोबत धूमधडाक्यात

टँगो नृत्य

करेल, असा त्याचा अर्थ नाही. मुळात चीन हा अत्यंत महत्त्वाकांक्षी, आक्रमक, विस्तारवादी देश आहे. त्या देशाने जाणीवपूर्वक साहसवादी धोरण अवलंबले आहे. त्यातूनच तो मागील 75 वर्षे भारतासारख्या शेजारी राष्ट्राची चहूबाजूंनी कोंडी करीत आहे. तेव्हा परस्पर संबंधांनी अमृतमहोत्सवी पल्ला गाठला म्हणून चीन भारताविषयीचे परंपरागत शत्रुत्व सोडून देईल, गिळंकृत केलेला लडाखमधील हजारो चौरस किलोमीटरचा भूभाग हसत हसत भारताच्या हवाली करेल, अरुणाचल प्रदेशवरील हक्काचा त्याग करेल, सीमेवरील भारतविरोधी कुरापती आणि उचापती थांबवेल, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आदी आपल्या शेजारी देशांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्यावर नेम धरणार नाही, असे अजिबात होणार नाही. 1962 मधील विश्वासघातकी आक्रमणापासून 2020 मधील गलवान खोऱयातील भयंकर सैनिकी चकमकीपर्यंत जे घडले तेच भारत-चीन राजनैतिक संबंधांच्या अमृत महोत्सवानंतरही घडणार आहे. ना चिनी ड्रगन आणि भारतीय हत्ती टँगो नृत्य करताना दिसतील ना चिन्यांच्या भारतविरोधी कारवाया थांबतील. भारत-चीन संबंध मागील 75 वर्षे चीनसाठी ‘अमृत’ ठरले आहेत आणि भारतासाठी मात्र ते ‘हलाहल’च राहिले आहे. संबंधांच्या पंचाहत्तरीनिमित्त चिनी राष्ट्राध्यक्षांनी भारताला ‘हत्ती’ संबोधले म्हणून हुरळून गेलेल्या मोदीभक्तांना हे कोणी सांगायचे?

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अदानी कर लादल्यामुळे मुंबईकरांवर आर्थिक ताण, कचरा शुल्कावरून आदित्य ठाकरे यांचं पालिका आयुक्तांना खरमरीत पत्र अदानी कर लादल्यामुळे मुंबईकरांवर आर्थिक ताण, कचरा शुल्कावरून आदित्य ठाकरे यांचं पालिका आयुक्तांना खरमरीत पत्र
मुंबई शहरातील सामान्य नागरिकांवर आधीच विविध कर आणि शुल्कांचा भार आहे, त्यातच आता अजून एक अदानी कर लादल्यामुळे नागरिकांना मोठ्या...
IPL 2025 – KKR च्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादच लोटांगण, कोलकाताने 80 धावांनी केला विजय साजरा
उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसणार? सोलापुरातून मोठी बातमी समोर
गूगल मॅपने पुन्हा दिला धोका, चुकीचे लोकेशन दाखवल्याने कार राँग साईडला गेली अन् दोन तरूणींचा करुण अंत
मासिक पाळीमुळे नवरात्र पूजा करता आली नाही, नैराश्येतून महिलेने उचलले टोकाचे पाऊल
लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, फळांसह पालेभाज्यांचे नुकसान
शक्तिपीठ महामार्ग व कर्जमाफी या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर शिंदेंना अडवणार, कुणाल कामराचं गाणं वाजवून विरोध करणार