Chhatrapati sambhaji nagar news – बजाजनगरात दारूड्या पतीने चिरला पत्नीचा गळा, पतीविरुद्ध गुन्हा दाखल
‘दुकानात दारू पिऊन बसल्याने ग्राहकांवर परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही दुकानात दारू पिऊन बसू नका…’ अशी विनवणी पत्नीने केली. पत्नीच्या बोलण्याचा राग आल्याने पतीने थेट कात्रीने पत्नीच्या गळ्यावर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजता बजाजनगरातील त्रिमूर्ती चौकात घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कोमल ऋषीकेश खैरे हिला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असून हल्ला करणाऱ्या पतीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्रिमूर्ती चौकात किराणा दुकान चालवून कोमल ऋषीकेश खैरे आपला उदरनिर्वाह करतात. त्यांना 5 वर्षीय आरोही नावाची मुलगी आहे. ऋषीकेश खैरे याला दारू पिण्याची सवय आहे. तो दुकान बंद करून बाहेर फिरत असतो. त्यामुळे पत्नी कोमल हिने अनेकवेळा समजावण्याचा प्रयत्न केला. यावरून दोघांमध्ये कायम वाद होत असे. आज सकाळी याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर त्याने कात्रीने कोमलच्या गळ्यावर वार केला.
त्यावेळी घरातून ओरडण्याचा आवाज आल्याने शेजारी राहणाऱ्या गंगा बेवले, अंजली गायकवाड या महिलांनी खैरे यांच्या घरी धाव घेतली. त्यांनी जखमी कोमलला त्याच्या तावडीतून सोडविले. तात्काळ बजाजानगरातील एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या घटनेत कोमल ही गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहे.
दरम्यान, पत्नीवर वार करून पती ऋषीकेश खैरे हा फरार झाला. या प्रकरणी कोमलचा भाऊ सचिन खरात (रा. नारेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List