देशाला धर्मशाळा बनवण्याचा कुणाचा उद्देश नाही, हा देश म्हणजे जेल नाही! संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावले
हा देश म्हणजे धर्मशाळा नाही, या देशाला धर्मशाळा बनू देणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री सांगत आहेत. या देशाला धर्मशाळा बनवण्याचा कुणाचा उद्देश नाही. आम्ही कुणी तसं होऊदेखील देणार नाही. पण हा देश म्हणजे जेलदेखील नाही हे लक्षात ठेवा, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावले.
राज्यसभेत इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल-2025 यावरील चर्चेत भाग घेताना राज्यसभेत संजय राऊत म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून या देशातील लोकांना एक प्रकारे जेलमध्ये ठेवण्यात आले आहे, पण जे लोक विदेशातून अधिपृतपणे पासपोर्ट आणि व्हिसावर येथील त्यांनादेखील या कायद्यांतर्गत सरकार जेलमध्ये ठेवू पाहत आहे. यामुळे देशात येणारे पर्यटकदेखील हळूहळू येण्याचे बंद करतील याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधले. या कायद्यातील सेक्शन 7 मध्ये असे म्हटलं आहे. या ठिकाणी येणाऱ्या परदेशी नागरिकाच्या हालचालीवर केंद्र सरकारचे नियंत्रण राहणार आहे. तो कुठल्या हॉटेलात थांबणार, कुठे फिरणार हे सरकार ठरवणार आहे. कोणी म्युझिशियन असेल, आर्टिस्ट, सोशल अॅक्टीव्हिस्ट वा डिप्लोमेट असेल तर सरकार ठरवणार तो कुठे जाणार आहे. जर एखाद्य विदेशातील विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ, पत्रकार या देशात येतील आणि त्यांना येथील प्रमुख राजकीय नेते यांना भेटायचे असेल तर त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल.
ए कोण बोललं रे बाळासाहेब…
शिवसेना नेते संजय राऊत यांचे भाषण सुरू असताना सत्ताधारी बाकावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत कमेंट करण्याचा प्रयत्न केला, त्याची चांगलीच हजेरी संजय राऊत यांनी घेतली. ए कोण बोललं रे बाळासाहेब… तुम्हाला काय माहीत बाळासाहेब ठाकरे कोण आहेत? तुम्ही दहावेळा पक्ष बदलणारे लोक आहात, असे खडे बोल त्यांनी सुनावले. या देशात कोणी बेकायदेशीर येऊन राहू नये, मग ते बांगलादेशी असतील, रोहिंगे असतील वा अमेरिकन अथवा युरोपियन नागरिक असोत त्यांनी बेकायदेशीरपणे हिंदुस्थानात वास्तव्य करू नये, अशी आमचीदेखील भूमिका असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List