भाजपच्या नेत्यांना जिनांहून अधिक मुस्लिमांचा कळवळा, वक्फच्या जमिनीवर तुमचा डोळा; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

भाजपच्या नेत्यांना जिनांहून अधिक मुस्लिमांचा कळवळा, वक्फच्या जमिनीवर तुमचा डोळा; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत वक्फ सुधारणा विधेयकावरून सत्ताधारी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. वक्फ बोर्डाच्या जमिनी तुम्ही त्या ताब्यात घेणार, असं दिसतंय. म्हणजेच काय की, जमिनीवरती तुमचा डोळा आहे. संसदेत मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषणं ही म्हणजे अतिशयोक्ती करायची झाली तर, जिनांनाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषणं ही खुद्द अमित शहांपासून त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी केली, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

आज 3 एप्रिल आहे. तारखेपासून सुरुवात एवढ्यासाठी केली कारण आपल्या सर्वांना आठवू नये या करता काल बिल मांडलं गेलं. साधारणतः एक महिना, पंधार वीस दिवस आधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्याला एक इशारा दिला होता की हिंदुस्थानने जे काही कर आहे ते कर कमी करावेत नाहीत तर, आम्हीही जशास तसे कर लावू. त्या कराच्या आकारणीला सुरुवात त्यांनी आजपासून केली आहे. शेअर बाजार कोसळला आहे. सेन्सेक्समध्ये मोठ्या प्रमाणात पडझड होतेय. देशाच्या आर्थिक पाठकण्याचा हा विषय आहे. कदाचित आर्थिक पाठकणा मोडेल की काय? आर्थिक संकट मोठं आपल्या देशावर आदळेल की काय, अशी ही परिस्थिती असताना देशाच्या पंतप्रधानांनी, देशाच्या अर्थमंत्र्यांनी आणि देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बाकीचे सगळे विषय बाजूला ठेवून देशाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. या संकटाचा मुकाबला आपण काय करणार आहोत? आपल्याला काय पावलं उचलण्याची गरज आहे, आपण काय केलं तर त्याचा परिणाम काय होईल, त्याचा दुष्परिणाम काय होईल? अशी जर का काल त्यांनी भूमिका घेतली असती तर, आणखी एक गोष्ट सांगतो मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा चीन घुसला होता आपल्या देशामध्ये अरुणाचलच्या भागामध्ये. कोरोनाचा काळ होता पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती. तेही तेव्हा घरी बसून काम करत होते. देशातल्या सगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रमुख पक्षातील नेत्यांना त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विश्वासात घेतलं होतं. आम्ही सगळ्यांनी एकमुखाने सांगितलं होतं की आपण देशाचे पंतप्रधान आहात, आपण देशाच्या हिताचेच निर्णय घ्याल अशी आम्हाला खात्री आणि विश्वास आहे. आपण याबाबत जो काही निर्णय घ्याल त्याला आमचा पाठिंबा असेल. जर त्या पद्धतीने हे देशासमोर येणारं आर्थिक संकट सगळ्या देशवासियांना त्यांनी सांगितलं असतं आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण काय पावलं उचलणार आहोत हे सांगितलं असतं तर, बरं झालं असतं. आम्ही एकमुखाने एका क्षणाचीही चर्चा न करता त्यांना पाठिंबा दिला असता. दुर्दैवाने तसं झालं नाही. उलटं असं वाटतंय की, त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं, आपण त्याच्याकडे काही करू शकत नाही. पाकिस्तानला इशारा देऊ शकतो. चीनला देऊ शकत नाही. आमेरिका तर फार दूर राहिली. आणि मग काय करायचं? ते जे काही करतील ते भोगत बसायचं. आणि ते भोगतोय हे आपल्याला कळू द्यायचं नाही म्हणून मग कुठेतरी वेगळे विषय काढायचे, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

हा एक खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. आज तरी मी आपेक्षा करतोय. अधिवेशन सुरू आहे. लोकसभेत आणि राज्यसभेत सगळे विषय बाजूला ठेवून या आर्थिक संकटाबद्दल आपल्याला… आता पंतप्रधान परदेशात गेलेत, परराष्ट्रमंत्री कुठे आहेत? काही कल्पना नाही. अर्थमंत्र्यांनी तरी एक आवाहन केलं पाहिजे. बाकी गृहमंत्र्यांचा तर काय आनंदच आहे. पण त्यांनी देशाला शासकीय भाषेत अवगत केलं पाहिजे. पण तशी आपेक्षा यांच्याकडून करणं खूप चुकीचं ठरेल. पण त्यांनी हे करणं गरजेचं आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

”भारतीय जनता पक्षाचं विकृत राजकारण”

नुकतीच ईद झालेली आहे. ईदच्या वेळेला या सगळ्या लोकांनी ईदच्या मेजवाण्या झोडल्या आहेत. ईदच्या मेजवाण्या झोडून ढेकर देऊन काल वक्फ बोर्डाचं बिल मांडलेलं आहे. योगायोग असा की किरेन रिजिजू यांनी हे बिल मांडलं. या किरेन रिजिजू यांनीच एकेकाळी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं. त्यांनीच वक्फ बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं, हा ठरवून आणलेला योगायोग आहे. नेमकं भारतीय जनता पक्ष करतंय काय? तर हेच कोणाला कळत नाहीये. कारण कधीतरी सांगायचं औरंगजेबाची कबर खोदणार, मग त्यांची लोकं कुदळ फावडे घेऊन जातात, खणायला सुरुवात करतात. मग वरून आदेश द्यायचा, नाही नाही खोदू नका परत माती टाका. मग परत माती टाकतात. मध्ये म्हणायचं मशिदीत घुसून मारणार, लोकं मारायला जातात, त्यांना सांगायचं थांबा थांबा थांबा… ही तुमची बाकीची हत्यारं बाजूला ठेवा, हे सौगात-ए-मोदी घेऊन जा. हे कळतच नाही नेमकं काय चाललेलं आहे? लोकांना लढवायचं, झुंजवायचं आणि आपण आपल्या राजकारणाच्या पोळ्या त्याच्यावरती भाजायच्या असं हे विकृत राजकारण सध्या भारतीय जनता पक्ष करतोय, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

वक्फ बोर्डाच्या दोन लाख कोटी रुपयांच्या जमिनीच्या सौद्यासाठी हे विधेयक आणलं, संजय राऊत यांचा घणाघात

“चीनने पँगाँग लेकच्या 40 हजार वर्ग किलोमीटरचा भूभाग व्यापला, आपण कोणीच त्याबद्दल बोलत नाहीये”

काल साधरणतः मध्ये-मध्ये ही चर्चा बघत होतो. या चर्चेत वक्फ बोर्डातल्या काही सुधारणा आहेत. जरूर त्यातल्या काही चांगल्या आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण आतापर्यंतचा अनुभव असा आहे की यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत. गरीब मुसलमानांबद्दल त्यांनी जे बोलले त्याच्याबद्दल मी भाष्य करेनच. परंतू, काश्मीरमधून 370 कलम जे काढलं गेलं, आम्ही त्याला पाठिंबा दिला. याचं कारण ज्यावेळेला तिथे जी काही अंदाधुंद एक बेबंदशाही चालू होती आणि अनेक हजारो काश्मिरी पंडित हे आपल्या देशात आपली घरं सोडून आपल्या इतर राज्यांमध्ये निर्वासितांसारखे फिरत होते. तेव्हा हिंदुहृदयस्रमाट शिवसेनाप्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला. 370 कलम काढल्यानंतर जी एक आशा दाखवली गेली की, हे सगळे काश्मिरी पंडित आपआपल्या घरी परत जातील. आता 370 कलम काढून किती दिवस झाले, किती वर्षे झाली त्या काश्मिरी पंडितांपैकी किती जणांना त्यांच्या जमिनी परत दिल्या गेल्या? हे पहिले त्यांनी सांगण्याची गरज आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनीबाबत काय निर्णय घ्यायचा, तुम्ही काल घेतलाच आहे. पण काश्मिरी पंडितांच्या जागा तुम्ही देणार आहेत का नाही परत? का त्यांना अजून त्यांच्या घरामध्ये हक्काच्या राज्यामध्ये बिनाधास्तपणे जाता येत नाही? त्याचाही खुलासा गृहमंत्र्यांनी केला पाहिजे. त्याच बरोबरीने आपण पाकव्याप्त काश्मीरची जी जमीन आहे त्याच्याबद्दल काही भूमिका घेतलेली नाही. चीनने तर पँगाँग लेकच्या 40 हजार वर्ग किलोमीटरचा भूभाग व्यापला आहे. आपण कोणीच त्याबद्दल बोलत नाहीये, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला फैलावर घेतले.

“जिनांनाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषणं अमित शहांपासून त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी केली”

वक्फ बोर्डाच्या जमिनी तुम्ही त्या ताब्यात घेणार, असं दिसतंय. म्हणजेच काय की, जमिनीवरती तुमचा डोळा आहे. बरं कालची सगळ्यांची जर का भाषण ऐकली तर, मला वाटतं देशाच्या इतिहासात पहिल्या प्रथम देशाच्या संसदेत मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषणं ही म्हणजे अतिशयोक्ती करायची झाली तर जिनांनाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषणं ही खुद्द अमित शहांपासून त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी काल केलेली आहेत. मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे की मुस्लिमांच्या बाजूने आहे? जर मुस्लिमांच्या बाजूने असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे? मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही बाजू मांडली की गरीब मुसलमान को ये होगा, मुस्लिम महिलांओको ये करेंगे, अमूक करेंगे, तमूक केरेंगे. मग हिंदुत्व आम्ही सोडलं की तुम्ही सोडलं? कारण आमच्यावरती जो काही आरोप करताहेत की बाळासाहेबांचे विचार, काय आहेत बाळासाहेबांचे विचार? 1995 मध्ये जेव्हा या राज्यात सत्ता आली होती तेव्हा इथेच बीकेसीमध्ये हिंदुहृदयसम्राटांनी तेव्हा मुस्लिम लोकांना इज्तेमा उत्सव करण्याची परवानगी दिली होती. आज तीच जागा बरोबर व्यापारासाठी बुलेट ट्रेनच्या घशात घातली आहे. हे तुमचं हिंदुत्व आहे? आणि तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला.

‘वक्फ’ विधेयक लोकसभेत मंजूर, देशभरातील 9.4 लाख एकर जमिनीवर नियंत्रण कुणाचे?

“हे बिल मुसलमानांच्या हिताचं आहे तर हिंदुत्व आम्ही सोडलंय का तुम्ही सोडलेलं आहे?”

किरेन रिजिजूंचं एक आश्चर्य वाटलं. अरविंद सावंत बोलल्यानंतर ते बोलले, बालासाहेब के आप थे तब हमको ऐसा लगता था… रिजिजूसाहेब मला पण काल वाईट वाटलं की तुमच्या नाकावर टिच्चून तुमचे मित्रपक्ष जेडीयूचे लल्लन सिंह बोलले. टीडीपीचे त्यांचे नेते बोलले की, आम्ही म्हणजे ते मुसलमानांच्या हिताचं रक्षण करणार. आणि हे असहायपणाने चीन आणि अमेरिकेसमोर आपली अवस्था झालीये तसं अमित शहा, पियुष गोयल, किरेन रिजिजू, राजनाथ सिंह हे त्यांच्याकडे बघूही शकत नव्हते. खाली मान घालून लाचारीने हसत होते. ही काय परिस्थिती आलीय. त्यांचा आधार घेऊन हे राज्य करताहेत. त्यांच्या तोंडावर हे ठणकावून सांगताहेत आम्ही मुसलमानांचं रक्षण करणार. आम्ही अमूक करणार आणि तमूक करणार. मग तुम्ही उठून सांगताहेत की हे बिल मुसलमानांच्या हिताचं आहे. मग नेमकं हे बिल मुसलमानांच्या हिताचं आहे तर हिंदुत्व आम्ही सोडलंय का तुम्ही सोडलेलं आहे? कारण आम्ही त्याच्यामध्ये काही सुचना सुचवू इच्छित होतो. जसं काल अरविंद सावंत यांनी भाषण केलं की प्रत्येक जाती-धर्माचे ट्रस्ट आहेत. आमची देवस्थानांची, मंदिरांची ट्रस्ट आहेत. त्या ट्रस्टवरती जर तुम्ही गैर हिंदू मुद्दामहून लादलात तर, आम्ही सहन करू का? आम्ही नाही सहन करू शकत. मग या वक्फ बोर्डावर तुम्ही गैर मुसलमान टाकताय, तुमचा अधिकार आहेच तो कोणी नाकारत नाहीये. या विषयावरती काल रविशकुमार यांनी एक अतिशय चांगला व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की, चंद्राबाबू पूर्वी कधी मुख्यमंत्री होते, तेव्हा शमशाबाद इथे साधारणतः अकराशे एकर जमीन ही विमानतळाला दिली. ती विमानतळाला जागा देताना राज्य वक्फ बोर्डाची परवानगी घेतली होती का? केंद्राची परवानगी घेतली होती का? नसेल किंवा असेल. थोडक्यात काय तुम्ही हे बिल न आणता सुद्धा जे तुम्हाला करायचं आहे, तुम्ही करत होतातच. विमानतळासाठी जागा तुम्ही घेतलीच, त्याला कोणी विरोध नाही केला. वक्फ बोर्डामध्ये जर काही अफरातफर चालू असेल तर जरूर त्याला पायबंद बसला पाहिजे. नक्कीच त्याच्यावरती पारदर्शकता आलीच पाहिजे. पण काही काही गोष्टी उगाचच तुम्ही उकरून काढताहेत. एवढं आता तिसरी टर्म तुमचं सरकार आलेलं आहे. आणि देशाच्या विकासाच्या गोष्टी रोजी-रोटीच्या गोष्टी या सगळ्या बाजूला ठेवून अजूनही तुम्ही हिंदू-मुसलमान, मग हिंदूंमध्ये मराठी-अमराठी, मग मराठी माणसाने खायचं काय? ही तुमची दादागिरी आम्ही सहन करणार नाही. अजिबात नाही. आम्ही काय करायचं, काय करणार हे जरा का तुम्ही आमच्यावरती लादणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

“…तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या”

जर आम्ही हिंदुत्व सोडलं असं कोणाचं म्हणणं असेल, असं काही बाटग्यांचं म्हणणं आहे. ज्यांना गद्दार, जे गाणं लागलंय गद्दार… त्या गद्दारांचं म्हणणं जर का असेल आम्ही हिंदुत्व सोडलं, मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या. तेव्हा तुम्ही लाज सोडली होती, का तुम्ही बोलला नाहीत? आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणारे आहेत, आम्हाला हे मान्य नाही. ही जी तुमची त्यांची चाललेली भलामण आहे, हे लांगुलचालन आहे हे आम्ही मान्य करू शकत नाही, म्हणून आम्ही यातून बाहेर पडतो, का बोलला नाहीत तुम्ही? असा टोला उद्धव ठाकरे यांनी गद्दारांना लगावला.

“भारतीय जनता पक्षाला आव्हान देतो…” 

मी स्वतः पुण्यातील आमच्या एका मुस्लिम कार्यकर्त्याला फोन केला होता. त्याने एका हिंदू व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले होते. मी त्याचं कौतुक केलं. शिवसेनाप्रमुखांनी कधीही सगळे मुसलमान देशद्रोही आहेत, असं कधीही म्हटलेलं नाही. आजही आमच्याकडे साबीरभाई शेख यांच्यासारखे अनेक कडवट देशनिष्ठ मुस्लिम कार्यकर्ते कार्यरत आहेत. आता त्याच्याबद्दल भाजपने एकदा जाहीर केलं पाहिजे. आणि परत एकदा सांगतो, आज सुद्धा भारतीय जनता पक्षाला पहिले आवाहन करतो नाहीतर आव्हान देतो की, तुम्ही जर का खरोखर एवढे हिंदू, हिंदुत्व करत असाल आणि तुम्हाला मुसलमानांचा जर का धिक्कार असेल तर परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा. आणि ही जुमलेबाजी बंद करा. गरीबांमध्ये या मारामाऱ्या लावालाव्या, दरवेळी ही भाजपची वाईट सवय आहे की, फटाक्याची वात पेटवायची आणि पळून जायचं. आणि ते फुटून सगळं झालं का मग मिरवायला यायचं की, आम्ही जाळली होती वात. पण वाट लागली त्याची जबाबदारी कोण घेणार? पहिले वात लावायची मग वाट लागल्यानंतर आपण यायचं, आम्हीच सगळं काही केलं या वृत्तीचा आम्ही विरोध केलाय. थोडक्यात आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्यानंतर या जमिनी बळकावून यांच्या व्यापारी मित्रांना ते जे काही देणार आहे, त्या भ्रष्टाचाराला आम्ही विरोध केला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भारत सरकारशी पंगा घेऊन खटला जिंकणारे एकमेव अभिनेते; सत्तेच्या तोंडावर नाकारली चित्रपटाची ऑफर भारत सरकारशी पंगा घेऊन खटला जिंकणारे एकमेव अभिनेते; सत्तेच्या तोंडावर नाकारली चित्रपटाची ऑफर
भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार आले आणि गेले, परंतु दिग्ग्ज अभिनेते मनोज कुमार यांच्यासारखं दुसरं कोणी नव्हतं. हिंदी सिनेसृष्टीत अनेक हिट...
मनोज कुमार यांचे गाजलेले ‘5’ सिनेमे, मोडले होते सर्व रेकॉर्ड
भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या मनोज कुमार यांचा सुपरस्टारपर्यंतचा प्रवास
सागर कारंडेंना इन्स्टाग्रामवर लाईक्स मिळवणं पडलं महागात, 61 लाखांची फसवणूक, काय आहे प्रकरण?
गावठी कट्टे, जिवंत काडतुसांसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेवगाव पोलिसांची कारवाई; आठ आरोपी गजाआड
वादळी पावसाने पुण्याला झोडपले! झाडे पडली, रस्त्यांवर पाणी, वाहतूककोंडी
डोंबिवली-ठाणे प्रवास धोक्याचा; कोपर-दिवा दरम्यान लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू