IPL 2025 – चिन्नास्वामीवर बटलर-सिराजचे राज, गुजरातचा बंगळुरूला दणदणीत धक्का
मोहम्मद सिराजने रचलेल्या पायावर जोस बटलरच्या झंझावाताने कळस चढवला. आयपीएलच्या पहिल्या दोन्ही सामन्यांत धडाकेबाज विजय नोंदविणाऱ्या बंगळुरूला त्यांच्या घरच्याच चिन्नास्वामी स्टेडियमवर जोसच्या 6 षटकार आणि 5 चौकारांच्या ‘हिटलर’ खेळीने पराभवाचा धक्का दिला. पराभवाने सुरुवात करणाऱ्या गुजरातने सलग दुसरा विजय नोंदविताना बंगळुरूचे 170 धावांचे आव्हान 17.5 षटकांतच तुडवले. बंगळुरूच्या फलंदाजीतल्या हल्लेखोरांना स्वस्तात बाद करणारा मोहम्मद सिराज गुजरातचा हिरो ठरला.
लिव्हिंगस्टोनने सावरले
42 धावांवर आघाडीचे 4 फलंदाज बाद झाले तेव्हाच बंगळुरूने मान टाकली होती, मात्र त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन संकटमोचकासारखा खेळला. त्याने जितेश शर्मासह 52 धावांची भागी रचली. जितेशने आपल्या 33 धावांत 5 चौकार आणि 1 षटकार खेचला. ही जोडी साई किशोरने पह्डली. मग पृणाल पंडय़ालाही तंबूचा रस्ता दाखवत यजमानांना पुन्हा अडचणीत आणले. मात्र तेव्हा लिव्हिंगस्टोनने टीम डेव्हिडच्या साथीने 46 धावा ठोकल्या. 5 षटकारांची आतषबाजी करणाऱ्या लिव्हिंगस्टोनने 54 धावा चोपल्या. त्याचीही खेळी सिराजनेच संपवली. सिराजने केवळ 19 धावांत 3 विकेट टिपण्याची सर्वोत्तम कामगिरी केली.
सिराजच्या भेदक सुरुवातीनंतर बंगळुरूच्या फलंदाजांना द्विशतकी मजल मारण्यात आलेले यश हेच विजयाचे खरे रहस्य ठरले. बंगळुरूला लक्ष्यापासून 30 धावा आधीच रोखणाऱ्या गुजरातने 13 चेंडू राखत विजय मिळवला. बंगळुरूच्या 170 धावा या गुजरातसाठी आव्हान नव्हतेच. शुभमन गिल 14 धावांवर बाद झाल्यावर बंगळुरू चांगली लढत देईल अशी अपेक्षा होती. पण गेल्या दोन्ही सामन्यांत 63 आणि 74 अशी अर्धशतके ठोकणाऱ्या साई सुदर्शनने आजही आपले चक्र प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या मानगुटीवर फिरवले. त्याने जोस बटलरसह पाऊणशतकी भागी रचत संघाचा विजय अधिक सोप्पा केला होता. सुदर्शनला अर्धशतकाच्या हॅटट्रिकची संधी होती, पण तो 49 धावांवर बाद झाला. त्यानंतर जोस बटलर नामक वादळ घोंगावले. त्याने 39 चेंडूंत 11चौकार-षटकारांचा पाऊस पाडत नाबाद 73 धावांसह बंगळुरूच्या आक्रमणाच्या चिंधडय़ा उडवल्या. त्याने रदरपर्ह्डसह पाच षटकांतच 63 धावांची भागी रचत गुजरातला विजय मिळवून दिला.
सिराजचे राज
बंगळुरूत आज सिराजचे राज चालले. गेल्या दोन सामन्यांत 31 आणि नाबाद 59 धावा काढणाऱ्या विराट कोहलीला आपल्या घरच्या मैदानात जोरदार खेळ करता आला नाही. अर्शद खानने (7) दुसऱ्याच षटकातील चौथ्या चेंडूवर कोहलीला बाद करून सनसनाटी सुरुवात केली, पण सर्वात मोठे धक्के सिराजने दिले. त्याने आधी देवदत्त पडिक्कलची यष्टी वाकवली आण मग पुढच्याच षटकात फिल सॉल्टचाही त्रिफळा उडवत बंगळुरूची 3 बाद 35 अशी अवस्था केली. त्यातच इशांत शर्माने कर्णधार रजत पाटीदारला पायचीत करत बंगळुरूला चौथाही धक्का दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List