कामराने प्रेक्षकांची माफी मागितली! मिंधे गटाची ‘टर’ उडवत…
स्टॅण्डअप कॉमेडियन पुणाल कामराविरुद्ध पोलिसांमार्फत समन्स आणि धमकीचे सत्र मिंधे गटाने सुरूच ठेवले आहे. ‘गद्दार’ गीताबद्दल माफी मागावी म्हणून दबाव टाकणाऱया मिंधे गटाची ‘टर’ उडवत कामराने ‘गद्दार’ गीताच्या शोला हजेरी लावलेल्या प्रेक्षकांची बुधवारी माफी मागितली. ‘प्रेक्षकहो, तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मागतो. मला मेल करा, तुमच्यासाठी व्हॅकेशन प्लॅन करतो,’ असे कामराने ‘एक्स’वरील नवीन पोस्टमध्ये म्हटले.
‘गद्दार’ गीत गाणाऱया पुणाल कामराविरुद्ध कारवाईसाठी मिंधे गट ईर्षेला पेटला आहे. ‘गद्दार’ गीताचा व्हिडीओ व्हायरल झाला, त्याचवेळी मिंधे गटाने कामराला माफी मागण्यासाठी धमकावले होते. नंतर तोडफोड आणि पोलीस कारवाई सुरू ठेवून कामराला नमवण्याचा प्रयत्न मिंधे गटाने केला, मात्र धमक्यांना भीक न घालता कामराने ‘एक्स’वर नवनव्या पोस्ट केल्या. बुधवारच्या पोस्टमध्ये कामराने प्रेक्षकांची माफी मागितली. सोबतच एक बातमी पोस्ट केली. त्या बातमीत खारघर येथील बँकिंग व्यावसायिकाच्या झालेल्या गैरसोयीबद्दल लिहिले. कामराविरुद्धच्या गुह्यात साक्षीदार म्हणून चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस खार पोलिसांनी व्यावसायिकाला पाठवली होती. त्यामुळे व्यावसायिकाला तामीळनाडू व केरळचा दौरा अर्ध्यावर सोडावा लागला. संबंधित व्यावसायिकाच्या झालेल्या गैरसोयीचा संदर्भ देत कामराने ‘गद्दार’ गीताच्या शोला हजर राहिलेल्या प्रेक्षकांची माफी मागितली. याचवेळी त्याने प्रेक्षकांना ‘व्हॅकेशन प्लॅन’ची ऑफर दिली. कामराच्या या नवीन पोस्टने मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे.
प्रेक्षकांना उद्देशून कामराची नवी पोस्ट
‘‘माझ्या शोला हजर राहिल्यामुळे तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. कृपया मला मेल करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी ‘व्हॅकेशन प्लॅन’ करू शकेन. देशात तुम्हाला जिथे कुठेही फिरायचे असेल तिथे तुम्ही फिरू शकाल.’’
पोलिसांनी पाठवले तिसऱ्यांदा समन्स
एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी खार पोलिसांनी कामराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुह्याच्या तपासात कामराने हजर राहावे यासाठी पोलिसांनी कामराला तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. याआधी पाठवलेल्या दोन्ही समन्सला कामराने प्रतिसाद दिला नाही. पोलिसांनी त्याला आता 5 एप्रिलला हजर राहण्याची सूचना केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List