‘टायगरचा वारसा जपायचा की…’, ECB चं पत्र मिळताच शर्मिला टागोर व्यथित; ‘पतौडी ट्रॉफी’चा चेंडू BCCI च्या कोर्टात ढकलला
इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2025) अठरावा हंगाम संपल्यानंतर हिंदुस्थानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही उभय संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. मात्र या दौऱ्यापूर्वी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने ‘पतौडी ट्रॉफी’ निवृत्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून या संदर्भात पतौडी कुटुंबाला पत्र लिहून माहितीही दिली आहे. यावर आता ज्येष्ठ अभिनेत्री आणि मन्सूर उर्फ टायगर अली खान पतौडी यांची पत्नी शर्मिला टागोर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘क्रिकबज’ने दिलेल्या वृत्तानुसार, आगामी मालिकेपूर्वी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड ‘पतौडी ट्रॉफी’ निवृत्त करण्याचा विचार करत आहे. हिंदुस्थान-इंग्लंड क्रिकेटला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर 2007 मध्ये ‘पतौडी ट्रॉफी’ सुरू करण्यात आली होती. 2007 मध्ये हिंदुस्थानने, तर 2011 मध्ये इंग्लंडने विजय मिळवला होता. विशेष म्हणजे दोन्ही वेळी मन्सूर अली खान पतौडी विजेत्या कर्णधाराला ही ट्रॉफी देण्यासाठी उपस्थित होते. त्यानंतर 2011 मध्ये त्यांचे निधन झाले.
2007 पासून सुरू झालेल्या ‘पतौडी ट्रॉफी’वर हिंदुस्थानला एकदाच कब्जा करता आला आहे. तर इंग्लंडने 2011, 2014 आणि 2018 मध्ये मालिका विजय मिळवत पतौडी ट्रॉफीवर नाव कोरले. तर 2022 मध्ये झालेली मालिका अनिर्णित राहिली होती. आता ही ट्रॉफीच निवृत्त करण्याच्या हालचाली सुरू झाली आहे. त्यामुळे ही ट्रॉफी हिंदुस्थानकडे येण्याची शक्यताही माळवली आहे.
दरम्यान, ईसीबीने ‘पतौडी ट्रॉफी’ निवृत्त केल्यास जून-जुलै 2025 मध्ये होणाऱ्या मालिकेला नवीन नाव दिले जाईल. ईसीबीने या संदर्भात मन्सूर अली खान पतौडी यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याला एक पत्रही पाठवले आहे. दुसरीकडे ईसीबीच्या या निर्णयामुळे अभिनेत्री शर्मिला टागोर व्यथित झाल्या आहेत.
‘हिंदुस्थान टाइम्स’शी बोलताना शर्मिला टागोर यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. ‘इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने सैफला एक पत्र लिहिले असून त्यात ‘पतौडी ट्रॉफी’ निवृत्त करण्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आता टायगरचा वारसा जपायचा की नाही हे बीसीसीआयवर अलवंबून आहे’, असे उत्तरादाखल त्या म्हणाल्या.
BCCI ची मोठी घोषणा; वर्षाच्या शेवटी दोन दिग्गज संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार, वेळापत्रक जाहीर
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List