Ratan Tata- रतन टाटांच्या मृत्युपत्रात स्वयंपाकी, ड्रायव्हर, केअरटेकर, कार क्लीनर कोणाकोणाला काय मिळाले? वाचा सविस्तर
रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर, आता नुकतेच त्यांचे मृत्युपत्र उघड करण्यात आलेले आहे. या मृत्युपत्रा मध्ये रतन टाटा यांनी कुणालाच निराश केले नाही. 3 हजार 800 कोटींच्या मृत्युपत्रात, टाटांसोबत कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर त्यांच्याशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली आहे. टाटांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची काळजी घेणाऱ्या स्वयंपाकी, ड्रायव्हर, केअरटेकर आणि कार क्लीनरलाही निराश केले नाही. रतन टाटा यांनी त्यांच्या घर आणि ऑफिसमधील कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या मृत्युपत्रात 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम नावावर केलेली आहे. इतकेच नाही तर, अर्धवेळ मदतनीस आणि कार क्लीनरची देखील काळजी घेण्यात आलेली आहे.
रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्युपत्रात, त्यांच्या घरात सात वर्षे किंवा त्याहून अधिक काळ काम करणाऱ्या सर्व घरगुती कर्मचाऱ्यांना त्यांच्या मालमत्तेतून 15 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच हे पैसे त्यांच्या सेवेच्या वर्षांच्या प्रमाणात वाटले जाणार आहेत. मृत्युपत्रात असेही लिहिले आहे की, अर्धवेळ मदतनीस आणि कार क्लिनरला एक लाख रुपये द्यावेत. टाटा यांनी त्यांच्या 3,800 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मोठा भाग रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्टला दिला आहे. मृत्युपत्रात विशेषतः काही दीर्घकाळ सेवा करणाऱ्या सेवकांचाही उल्लेख करण्यात आलेला आहे.
रतन टाटा यांनी त्यांचे दीर्घकाळचे शेफ राजन शॉ यांना 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम देऊ केली आहे. यात 51 लाख रुपयांची कर्जमाफी समाविष्ट आहे. बटलर सुब्बैया कोनार यांना 36 लाख रुपयांच्या कर्जमाफीसह 66 लाख रुपये मिळतील असे लिहीले आहे. सचिव डेलनाझ गिल्डर यांना 10 लाख रुपये दिले जातील. रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्युपत्रात लिहिले आहे की, त्यांचे कपडे एका स्वयंसेवी संस्थेला दान करावेत जेणेकरून ते गरजूंना वाटता येतील. रतन टाटा हे ब्रूक्स ब्रदर्स शर्ट, हर्मीस टाय, पोलो, डॅक्स आणि ब्रायोनी यासारख्या ब्रँडचे कपडे परिधान करायचे.
शंतनू नायडूचे 1 कोटी रुपयांचे कर्ज माफ
याशिवाय त्यांनी त्यांचे कार्यकारी सहाय्यक शंतनू नायडू यांचे 1 कोटी रुपयांचे कर्जही माफ केले. शंतनूने कॉर्नेल विद्यापीठात एमबीएचा अभ्यास करण्यासाठी हे कर्ज घेतले होते. टाटांनी त्यांचे शेजारी आणि ड्रायव्हर राजू लिओन यांचे 18 लाख रुपयांचे कर्जही माफ केले. रतन टाटा यांनी 23 फेब्रुवारी 2022 रोजीच्या त्यांच्या मृत्युपत्रात म्हटले आहे की, ‘मी माझ्या कार्यकारी अधिकाऱ्यांना शॉ, कोनार आणि राजू लिओन यांच्याकडून कर्ज वसूल करण्यासाठी कोणतीही कारवाई करू नये असे निर्देश देतो आणि ते माझ्या मालमत्तेचे थकबाकीदार मानले जाणार नाही. मी कर्जाची रक्कम संबंधित नोकर/चालकांना माझ्याकडून भेट म्हणून समजावी असे निर्देश देतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List