ऐश्वर्या-अभिषेकचा ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स पाहून तुम्हीही घटस्फोटाच्या चर्चा विसराल
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा अनेकदा झाल्या. या चर्चांवर दोघांनी कधीच प्रतिक्रिया दिली नाही, परंतु अनेकदा एकत्र येऊन त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला. आता पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि अभिषेक एकमेकांसोबत दिसले आहेत आणि ही भेट काही सर्वसामान्य नाही. यावेळी हे दोघं त्यांची मुलगी आराध्यासोबत चक्क ‘कजरा रे’ या गाण्यावर नाचताना दिसले. ऐश्वर्या आणि अभिषेक हे दोघं पुण्यात एका लग्नसमारंभात उपस्थित होते. ऐश्वर्याची चुलत बहीण श्लोका शेट्टीचं हे लग्न होतं. या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी ऐश्वर्या आणि अभिषेकच्या ‘कजरा रे’ गाण्यावरील डान्सच्या व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.
या व्हिडीओमध्ये वधू आणि वर अभिषेक-ऐश्वर्याला स्टेजवर त्यांच्यासोबत डान्स करण्यासाठी घेऊन येतात. त्यानंतर हे दोघं ‘बंटी और बबली’ या चित्रपटातील सुपरहिट ‘कजरा रे’ या गाण्यावर थिरकू लागतात. यावेळी त्यांच्यासोबत मुलगी आराध्यासुद्धा डान्स करताना दिसते. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. ‘कजरा रे’ या मूळ गाण्यात ऐश्वर्या, अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांनी डान्स केला होता. त्यानंतर आता आराध्यासोबत या जोडीला नाचताना पाहून चाहते खुश झाले आहेत.
‘या दोघांना असं एकत्र पाहून खूप चांगलं वाटतंय’, असं एकाने लिहिलं. तर ‘खूप चांगली जोडी आहे. या दोघांचा कधीच घटस्फोट होऊ नये’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘आजही या दोघांमधली केमिस्ट्री कमाल आहे’, असं आणखी एका युजरने लिहिलं आहे. गेल्या काही महिन्यांत ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांच्या घटस्फोटाच्या अनेकदा चर्चा झाल्या. परंतु त्यादरम्यानही अनेकदा ऐश्वर्या आणि अभिषेकला एकत्र पाहिलं गेलं होतं. आराध्याच्या शाळेच्या कार्यक्रमातही ऐश्वर्या ही अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसली होती. ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी 20 एप्रिल 2007 रोजी लग्न केलं. लग्नाच्या चार वर्षांनंतर ऐश्वर्याने मुलगी आराध्याला जन्म दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List