Jalana News लग्नानंतर सहा महिन्यातच सुनेने काढला सासूचा काटा, मात्र शेजाऱ्याने पाहिल्याने व्हावे लागले फरार
जालना शहरातील भोकरदन नाका येथे एका सुनेने सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार आज 2 एप्रिल रोजी पहाटे समोर आला. सविता संजय शिनगारे (45) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने जालन्यात खळबळ उडाली आहे.
जालन्यातील प्रियदर्शनी कॉलनी येथे सविता शिनगारे या सून प्रतीक्षा शिनगारे हिच्यासोबत भाड्याच्या घरात राहत. सविता यांचा मुलगा लातूर येथे नोकरीनिमित्त राहत असल्याने घरी सासू आणि सून अशा दोघीच होत्या. कौटुंबिक वादातून बुधवारी पहाटे प्रतिक्षाने सासूचे डोके भिंतीला आपटले. यातच सासू सविता यांचा मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रतिक्षाने मृतदेह पोत्यात भरून घराबाहेर आणला. मात्र, घर मालकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी लागलीच पोलिसांना याची माहिती दिली. तोपर्यंत प्रतीक्षा मृतदेह सोडून फरार झाली होती.
अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमर्यांचे फुटेज घेतले आहेत. आरोपीच्या शोधार्थ एलसीबी आणि सदरबाजार पोलीस ठाण्याचे पथक रवाना झाले आहे. दरम्यान, सूनेने आपल्या सासूला इतक्या निघृणपणे का संपवले? या हत्येत आणखी कोणाचा सहभाग होता का? असे अनेक सवाल उपस्थित होत असून यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करुन घरी आलेल्या सूनेने इतक्या भयंकरपणे सासूला संपवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List