‘मी गुंड असतो तर बरं झालं असतं’, सलमानच्या सिकंदरमुळे मराठी सिनेमा हटवल्यामुळे अभिनेता संतापला
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ‘सिकंदर’ हा सिनेमा जवळपास दोन वर्षानंतर ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना चांगल्या अपेक्षा होत्या. पण एकूणच चित्रपटाची कथा पाहात प्रेक्षक नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही फारशी कमाई केलेली दिसत नाही. असे असताना देखील चित्रपटगृहांमधून मराठी सिनेमे हटवण्यात आले आहेत. ते पाहून एका मराठमोळ्या अभिनेत्याने संताप व्यक्त केला आहे.
अनेकदा मराठी सिनेमांवर अन्याय होते हे कलाकारांकडून ऐकायला मिळते. आता अभिनेता पुष्कर जोग दिग्दर्शित ‘हार्दिक शुभेच्छा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २१ मार्च २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र, ‘सिकंदर’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ‘हार्दिक शुभेच्छा’चे शो हटवण्यात आले आहेत. त्यावर पुष्कर जोगने पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
वाचा: पुन्हा एक फ्लॉप सिनेमा… काय आहे सलमान खानच्या ‘सिंकदर’ची कथा? वाचा रिव्ह्यू
काय म्हणाला पुष्कर?
पुष्कर जोगने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला ही पोस्ट शेअर केला आहे. ”‘सिकंदर’सारखा चित्रपट आला की, आमची दुसऱ्या आठवड्यात चाललेली फिल्म काढायची. छान! खरं तर मी गुंड असतो, तर बरं झालं असतं. निदान राग काढता आला असता. यासाठी कोणी कधीच काहीच करीत नाही, याचा अभिमान वाटतो” असे पुष्कर जोग म्हणाला आहे. तसेच त्याने या पोस्टमध्ये हॅशटॅग देत ‘जोग बोलणार’ असे म्हटले आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकजण त्यावर कमेंट करताना दिसत आहेत.

Pushkar
‘हार्दिक शुभेच्छा’ सिनेमाविषयी
‘हार्दिक शुभेच्छा’ हा चित्रपट २१ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. पण हा चित्रपट चांगली कमाई करत असल्याचा दावा पुष्करने केला आहे. या चित्रपटात पुष्कर सोबत हेमल इंगळे, पूर्वी मुंदडा, विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्वीक प्रताप, विजय पाटकर, भरत सावळे व किशोरी अंबिये यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन पुष्कर जोगने केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List