शिवसेनेची भूमिका स्पष्ट, तळ्यात-मळ्यात नाही; वक्फ विधेयकावर संजय राऊत यांचं मोठं विधान
वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी लोकसभेत मांडण्यात येणार आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, असे विधान शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार दिल्लीत खासदारांनी चर्चा केली. आज पुन्हा पक्ष कार्यालयात बसणार आहोत. आमची भूमिका ठरलेली असून तुम्हाला ती शेवटच्या क्षणी दिसेल, असे राऊत म्हणाले. वक्फ सुधारणा विधेयकावर संध्याकाळी मतदान होणार आहे. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. ही भूमिका आमच्या खासदारांपर्यंत पोहोचली आहे. ही भूमिका सभागृहात सांगायची असते, माध्यमांसमोर नाही. काही गोष्टी सभागृहात करायच्या असतात, त्या आम्ही करू. मतदान होईल तेव्हा शिवसेनेचे खासदार बाहेर येऊन सर्व सांगतील, असेही राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, शिवसेना खासदार सभात्याग करणार नाहीत. आम्ही पळपुटे नाही. आम्ही जी भूमिका स्वीकारली ती स्वीकारली आहे. आमचे तळ्यात-मळ्यात नाही. आधी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते आणि आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी आदेश दिला तर तो आदेश जसाच्या तसा पालन करण्याची आमची मानसिकता आहे. पक्षाच्या आदेशाला आम्ही बांधिल असून आमच्या पक्षाने व्हिप काढलेला आहे.
मंगळवारी रात्री काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत विरोधी पक्षाच्या खासदारांची बैठक झाली. तिथे आमची भूमिका ठरलेली आहे. आधी चर्चा करायची, प्रत्येकाने आपले मुद्दे मांडायचे. हा आघाडीचा निर्णय आहे. पण मुळात यावर मतदान होऊ देतील की नाही हा प्रश्न आहे. महिला विधेयकाच्या वेळी सभागृहात ज्या पद्धतीचा गोंधळ, दंगल झाली तशाच प्रकारची दंगल दोन्ही सभागृहात घडवण्याचा डाव भाजपचा आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
शिवसेना खासदार अरविंद सावंत जेपीसीवर होते. त्यांनी सर्व बैठकींना हजेरी लावलेली आहे. त्यांनी ज्या गोष्टीला आक्षेप घेतला त्या रेकॉर्डवर आहेत. आमच्या भूमिका पारदर्शक आहेत, असे राऊत म्हणाले. वक्फ बोर्ड आणि हिंदुत्व असे करून तुम्ही हिंदुत्वाचा अपमान करत आहात. वक्फ बोर्ड पूर्णपणे वेगळा विषय आहे. अयोध्या हा हिंदुत्वाचा विषय आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवणे, काशी-मथुरा, शिवराय हा हिंदुत्वाचा विषय आहे. छत्रपती संभाजीराजांची हत्या हिंदुत्वाशी संबंधित आहे. पण वक्फ बोर्डाचा विषय हिंदुत्वाचा विषय नाही, आज बिल पासही झाले तरी त्याचा देशाच्या समाज जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, बिहार सारख्या राज्यामध्ये हिंदू आणि मुसलमान यात दुफळी माजावी, गोंधळ निर्माण व्हावा, दंगली व्हाव्यात अशी भाजपची भूमिका आहे. नितीश कुमार हे पूर्णपणे मानसिक, शारीरिक दृष्ट्या विकलांग झाले आहेत. या निमित्ताने त्यांचा पक्ष गिळायचा, नष्ट करायचा आणि आपल्यात सामावून घ्यायचा हे भाजपचे पुढचे पाऊल आहे. नितीश कुमार यांच्यानंतर हा पक्ष अस्तित्वातच राहणार नाही. तो एकखांबी तंबू असून निवडणुकीनंतर त्यांचा पक्षच ठेवायचा नाही आणि संपूर्ण बिहारवर राज्य करायचे धोरण भाजपचे आहे, असेही राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List