‘आई तुळजाभवानी’ मालिकेत खास राज्याभिषेक सोहळा; अशी झाली तयारी
अलौकीक सौंदर्याचे प्रतीक, अगाध शक्तीचे स्वरूप, अपरिमित वात्सल्याची मूर्ती, धर्मरक्षिण्या आसनस्थ होणार सिंहासनी 'आई तुळजाभवानी'. कलर्स मराठी वाहिनीवर आई राजा म्हणजेच तुळजाभवानीचा नेत्रदीपक राज्याभिषेक सोहळा सप्ताह संपन्न होणार आहे.
आई तुळजाभवानी अर्थात माता पार्वतीचे गुरु भगवान महादेव यांच्या मागर्दशनानुसार भक्तांच्या मनात भयमुक्तीचे बीज रुजवण्यासाठी, दैवी कृपेची ज्योत पेटवण्यासाठी देवीच्या अढळस्थानासोबत तिचे कायमस्वरूपी अधिष्ठान निर्माण होण्यासाठी तिचा राज्याभिषेक आयोजित केला गेला आहे.
देवी स्वत:चे महत्व वाढवून घेण्याच्या विरोधात असल्यातरी भक्तांच्या आयुष्यात निर्माण झालेल्या अनेक कसोटींच्या क्षणामुळे आणि महिषासुराच्या वाढत्या अत्याचारामुळे देवी राज्याभिषेकाचा प्रस्ताव स्वीकारते.
समस्त देवगण, ऋषी, योगिनी, गण, नंदी, देवीच्या आतापर्यंत पृथ्वीवरच्या निवासादरम्यान जवळचे नाते निर्माण झालेले प्रिय गावकरी यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य सोहळा संपन्न होणार आहे.
देवीच्या राज्याभिषेकासाठी संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली. त्या काळानुसार कुठले रंग असतील? शालू कुठला असेल? या सगळ्याचा खूप विचार करण्यात आला. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे देवीचा मुकुट. देवीच्या देवळात जसा मुकुट आहे तसाच असला पाहिजे.
कारण देवी जेवढी तेजस्वी त्या मुकुटात दिसते तेवढी कुठल्याच मुकुटात दिसत नाही. दागिने तब्बल दीड ते दोन महिन्याआधी डिझाइन करून घेतले होते. मंगळसूत्राच्या वाटीसारखा दागिना हवा होता. पहिल्या रुपासाठी कोलकात्यावरून खास दागिने बनविण्यात आले.
यावेळेस लूक वेगळा असल्याने खास नवग्रहाचे पेंडन्ट असलेला चोकर खास बनवून घेण्यात आला. शेला तयार करताना मालिकेच्या टीमला खूप वेळ लागला. पण, दोन तीन महिन्यात संपूर्ण लूकची तयारी टीमने केली.
या सोहळ्यात आई राजा उदो उदोचा गजर पहिल्यांदा घडेल पण त्याच बरोबरीने देवीने राजदंड हाती घेतल्यानंतर न्यायनिवाड्यासाठी देवी समोर पहिले मागणे मागितले जाईल ते दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्याकडून. ते काय असेल? देवी काय न्याय देईल? हा अत्यंत उत्सुकतेचा रंजक कथाभाग या राज्याभिषेक विशेष भागात उलगडणार आहे.
देवीच्या राज्याभिषेकादरम्यान उभा राहिलेला हा पेच आई तुळजाभवानीच्या अवतार कार्याला कोणते वेगळे वळण देणार ? शुक्राचार्यांचे गुरु भगवान महादेव काय भूमिका घेणार? देवीच्या मंत्रिमंडळात कोण असेल? प्रत्यक्ष गुरु महादेव समोर असताना देवी राजेपद कसे स्वीकारेल हा नाट्यमय भाग या राज्याभिषेक विशेष भागात दिसणार आहे,
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List