भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून शिवसेना हिंदुत्वाच्या मिशांना पिळ देत फिरतेय! संजय राऊत यांचा फडणवीसांवर निशाणा
‘देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये. भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून शिवसेना हिंदुत्वाच्या मिशांना पिळ देत फिरतेय’, असा जबरदस्त हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. वक्फ विधेयकाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटबाबत विचारलेल्या प्रश्नाला राऊत दिल्लीत माध्यमांशी बोलताना उत्तर देत होते.
‘वक्फ विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही. वक्फ बोर्डामध्ये सरकार काही सुधारणा करू इच्छित आहे. पण त्या सुधारणांना फक्त मुसलमानांचाच विरोध आहे असे नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पूर्ण पाठिंबा नाही. भाजपने महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर तोडण्यासंदर्भात जी भूमिका घेतली होती, त्याला संघाने विरोध केला होता. याची गरज नाही, उगाचच वातावरण खराब करू नका, अशी भूमिका संघाने घेतली आणि वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाबाबतही संघाची भूमिका त्याच पद्धतीची आहे’, असे राऊत म्हणाले.
‘वक्फ विधेयक आणि हिंदुत्वाचा कुणी मेळ घालत असेल तर तो मूर्खपणा आहे. या विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे हे देवेंद्र फडणवीस सांगू शकतील का?’, असा सवाल राऊत यांनी केला. ‘इतर विधेयकांप्रमाणेच हे एक विधेयक आहे. सरकारने आणलेल्या विधेयकाचा संबंध असलाच तर वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर भविष्यात कब्जा मिळवण्यासाठी काही उद्योगपतींना सोपे जावे याच्याशी असून त्यासाठीच या विधेयकाचे स्पष्ट प्रयोजन दिसते’, असेही राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ‘शिवसेना ही प्रखर हिंदुत्वावादी आहे. शिवसेना प्रोग्रेसिव्ह विचारांचे हिंदुत्ववाद मानते. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने हिंदुत्वातील सुधारणा आणि विज्ञानवाद याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे बगलबच्चे वक्फ विधेयकाच्या निमित्ताने जी बांग देत आहेत हा मूर्खपणा आहे. हिंदुत्व हिंदुत्वाच्या ठिकाणी आणि अशा प्रकारचे विधेयक आपल्या ठिकाणी आहे.’
‘आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना भाजपने आणलेल्या 370 कलम विधेयकाला पाठिंबा दिला होता. तो विषय राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदुत्वाच्या संदर्भात होता. शिवसेनेने तिहेरी तलाकच्या बिलालाही विरोध केला नाही. कारण तो विषय गरीब मुस्लिम महिलांच्या संदर्भातला होता. वक्फ बोर्डाच्या विधेयकाचा विषय हा त्यांच्या लाखो लाखो कोटी रुपयांच्या जमिनी संदर्भातील आहे. त्याच्यात कुणाला तरी घुसवून भविष्यात ती संपत्ती आपल्या लाडक्या उद्योगपतींना देता येतील का यासाठी झालेली ही पायाभरणी आहे हे स्पष्ट दिसतेय’, असेही राऊत यावेळी म्हणाले.
‘मुंबईमध्ये जैन धर्मिय हिंदुंना जागा नाकारतात. एखादे बिल आणून हिंदुना जागा नाकारणाऱ्या या लोकांवर कारवाई होणार का? मी मराठी माणूस नाही, हिंदू म्हणतोय. कारण मुंबई, ठाणे, मिरा-भाइंदर इथे हिंदूंना जागा नाकारताहेत. हे भाजपचे, मंत्रिमंडळातील लोक आहेत, मुसलमान नाहीत. हिंदूंना जागा नाकारणे हा अत्यंत गंभीर विषय आहे. यावर वक्फप्रमाणे एखादे बिल केंद्रात किंवा राज्यात आणणार असतील तर आम्ही हिंदुत्वाचा विषय म्हणून पाठिंबा देऊ’, असेही राऊत म्हणाले.
वक्फ बोर्डाची 8 लाख प्रॉपर्टी असून त्याची किंमत अडीच लाख कोटी आहे. यावर सरकारच्या जवळच्या काही लाडक्या उद्योगपतींचा डोळा असावा आणि त्यासाठी हा कार्यक्रम. त्याला हिंदुत्वाचे नाव दिले असले तरी वक्फ विधेयक आणि हिंदुत्वाचा संबंध नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आमची शाळा घ्यावी. ते नवीन शंकराचार्य असतील तर त्यांनी शाळा घ्यावी, आम्ही त्याला उपस्थित राहू. वक्फ बोर्डाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध हे त्यांनी सांगावे, असे आव्हानच राऊत यांनी दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List