कोल्हापुरात प्रशासकीय कामासाठी येता की, ‘तांबड्या-पांढऱ्या ‘वर ताव मारून पर्यटनासाठी? ‘पंचगंगा’ प्रदूषणावरून विभागीय आयुक्तांना कृती समितीचा सवाल
कित्येक कोटी शासकीय निधी जमा होऊनही कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेली पंचगंगा नदी अद्यापही प्रदूषणमुक्त झालेली नाही. नदीत दररोज सांडपाणी मिसळतच आहे, यावर काहीच कारवाई होत नाही. त्यामुळे आपण कोल्हापूरला फक्त ‘तांबडा-पांढऱ्या’वर मारून पर्यटनासाठी येता काय, असा थेट सवाल कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांना पत्राद्वारे केला आहे.
पुणे विभागाचे आयुक्त म्हणून प्रशासकीय कामासाठी आपण वारंवार कोल्हापूरला येता, पण आम्हाला तसे वाटत नाही. कारण आपण पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयात फक्त बैठका घेता त्या वेळी आपणास संबंधित अधिकारी कागदोपत्री खोटी माहिती दाखवतात व तुम्ही त्यावर समाधान मानून निघून जाता. मात्र, कित्येक कोटी शासकीय निधी मंजूर आणि जमा होऊनही पंचगंगा नदी अद्यापही प्रदूषणमुक्त झालेली नाही. नदीत दररोज सांडपाणी मिसळतच आहे. यावर काहीच कारवाई होत नाही. त्यामुळे आपण कोल्हापूरला फक्त तांबड्या-पांढऱ्यावर ताव मारून पर्यटनासाठी येता, असे आमचे मत आहे, असे म्हटले आहे.
कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वाराजवळ वीटभट्टी नाला थेट पंचगंगा नदीला मिळतो. या नाल्यातून नजीकच्या उंचगाव, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, लोणार वसाहत, मार्केट यार्ड परिसरातील मैलामिश्रित सांडपाणी तसेच जनावरांची कत्तल करून टाकाऊ मांसांचे अवयव नाल्यात टाकतात. औद्योगिक वसाहतीचे रासायनिक सांडपाणीही नाल्यातून वाहत जाऊन थेट पंचगंगा नदीत गेली कित्येक वर्षे वाहत आहे. त्यामुळे या नाल्याच्या आजूबाजूची शेतजमीन व विहिरींचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या निगडेवाडी, गांधीनगर, पु. शिरोली, वळीवडे, चिंचवड पुढे रुई बंधाऱ्यापर्यंतच्या गावांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सांडपाणी रोखून त्यावर फिल्टर प्रक्रिया करावी, गेल्या वर्षभरात कोल्हापूर मनपाला बरीच निवेदने दिली आहेत. पण, महापालिका आश्वासनाशिवाय काहीच कार्यवाही करत नाही. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनाही वेळोवेळी कळविले असता त्यांनी दूषित पाण्याचा पंचनामा करण्याचे फक्त सोपस्कार पार पाडले.
मनपाचा आळशीपणा कारणीभूत; कारवाई करा
कोल्हापूर महापालिकेने अमृत-1 योजनेंतर्गत दुधाळी झोनमधील अंदाजे 74 कोटी रुपये निधीतील मलनिस्सारण योजनेतून याच नाल्यातील सांडपाणी अडवून फिल्टर हाऊसकडे वळविणे, या कामाची वर्कऑर्डर एका कंपनीला देऊन चार वर्षे झाली आहेत. पण, अद्यापि काम चालू नसल्याने दूषित सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत आहे. आयुक्तांचे प्रशासनावर काहीच नियंत्रण दिसत नाही. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मनपा प्रशासनावर विभागीय आयुक्त म्हणून कारवाई करून नागरिकांना या जीवघेण्या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. अशोक पोवार, रमेश मोरे, राजाभाऊ मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, अॅड. प्रमोद दाभाडे, प्रकाश आमते, विनोद डुणूंग, शिवाजी पाटील यांनी हे पत्र विभागीय आयुक्तांना पाठविले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List