शरद पवार गटात पुन्हा राजकीय भूकंप?, जयंत पाटील असं काय बोलले हसन मुश्रीफांकडे? मुश्रीफांचा दावा काय?
महाविकास आघाडीला विधानसभेत मोठा धक्का बसल्यानंतर आता सत्ताधारी महायुतीकडे जाण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटातील काही मातब्बर नेते उत्सुक असल्याचे वारंवार उघडकीस येत आहे. त्यात अर्थात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर कायम संशय घेतला जात आहे. यावरुन अनेकदा जयंत पाटील यांना पत्रकार प्रश्न विचारुन भंडावून सोडत असतात. आझाद मैदानात शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असताना पाटील यांनी केलेल्या भाषणात ‘माझं काही खरं नाही’ असा उल्लेख केल्याने त्यांच्या पक्षांतराबाबत वावड्या उठल्या होत्या. आता तर राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या नव्या वक्तव्याने या गदारोळात भर पडली आहे.
सोलापूरातील करमाळा येथील लिंबेवाडी येथे गोकुळ सौर ऊर्जा प्रकल्पाचे उभारणी होत आहे. गोकुळतर्फे 33 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यातून वर्षाला 7 कोटी वाचणार आहेत. या प्रकल्पाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्रकारांनी जयंत पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारले. त्यावेळी ते म्हणाले की जयंत पाटील मला नागपूरला भेटले होते. त्यावेळी त्यांनी सांगितलं की माझं मन लागत नाही. त्यावेळी जे बोलले ते मी सांगितलं आता मला जास्त माहिती नाही अशी पुस्ती त्यांनी यावेळी जोडली.
काँग्रेसचे नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे याबद्दल विचारले असता हसन मुश्रीफ म्हणाले की सत्ता नसताना आमदार टिकवणे फार मोठी गोष्ट आहे. अशा पद्धतीची वक्तव्य करणं हे विरोधक म्हणून त्यांचं काम आहे. कारण त्यांची संख्या फारच कमी आहे. 50 च्या आत त्यांची संख्या आहे, त्यांनाही वाटते सत्तेत यावं, परंतु ते काही शक्य नाही असे हसन मुश्रीफ यांनी वेळी सांगितले.
शक्तीपीठ लादणार नाहीच
शक्तीपीठ महामार्गाबाबत आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. शेतकरी म्हणाले शक्तीपीठ महामार्गाला जमीन द्यायची नाही तर आम्ही त्यांना पाठींबा देणार ते जर म्हणाले जमीन द्यायची तरी आम्ही पाठींबा देणार असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही महामार्ग करणार आहोत. परंतू तो लादणार नाही असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List