“बाळा” म्हणत आयफाच्या कार्यक्रमात शाहरुखची श्रेयाला मिठी अन्… व्हिडीओने चाहत्यांची मने जिंकली
राजस्थानच्या जयपुरमध्ये नुकतेच सगळे बॉलिवूड सेलिब्रिटी IIFA Awards 2025 मध्ये दिसले. 8 मार्च पासून सुरु झालेला हा पुरस्कार सोहळा 9 मार्च रोजी रात्री संपला. या दरम्यान, अनेक सगळेच कलाकार तिथे दिसले. यावेळी कार्यक्रमात सगळ्यात सुंदर आवाजाचा पुरस्कार हा श्रेया घोषालला मिळाला. तसेच श्रेयानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओची सगळ्यात जास्त चर्चा रंगली आहे. प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून तिच्या आयुष्यातील एक सुंदर क्षण सर्वांसोबत शेअर केला आहे. हा व्हिडीओ आहे तिचा आणि शाहरूख खानचा.
शाहरुखने जेव्हा श्रेयाला पाहिले तेव्हा….
श्रेया घोषालनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पापाराझी हे शाहरुखचे फोटो काढताना दिसत आहेत. तर दुसरीकडे श्रेया ही एका ठिकाणी उभी राहून त्याच्याकडे बघताना दिसतेय. त्यानंतर शाहरुख जेव्हा श्रेयाला पाहतो तेव्हा तो पापाराझींच्या गर्दीतून तिच्या दिशेनं येतो. श्रेयाला मिठी मारतो. श्रेयानं हा व्हिडीओ शेअर केला.
“माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण”
हा व्हिडीओ शेअर करत श्रेयानं कॅप्शन दिलं आहे की “माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण. त्याच्या नम्रतेचं आणि प्रेमाचं नेहमीच कौतुक होतं, मेगा स्टार शाहरुखवर सगळे याच कारणासाठी प्रेम करतात. आयफाच्या ग्रीन कार्पेटवर त्यानं मला मिठी मारली आणि आशीर्वाद देत म्हणाला, “बेटा तू कशी आहेस”, ही माझी सगळ्यात चांगली आठवण आहे. माझ्या करिअरची सुरुवात ही 23 वर्षांपूर्वी शाहरूखच्या देवदास या चित्रपटापासून झाली. राजस्थानमध्ये झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात ज्या ठिकाणी मी लहाणाची मोठी झाले आज 25 वर्षांनी हे संपूर्ण झालं आहे असं म्हणता येईल. देवाचे, माझ्या कुटुंबाचे, मित्रांचे आणि माझ्या चाहत्यांचे आभार.”
शाहरूख सोबतचा तो सुंदर आणि आनंदाचं क्षण चाहत्यांसोबत शेअर
अशी भलीमोठी पोस्ट शेअर करत श्रेयाने शाहरूख सोबतचा तो सुंदर आणि आनंदाचं क्षण चाहत्यांसोबतही शेअर केला आहे. श्रेयाने कार्यक्रमाच्या ग्रीन कार्पेटवरून शाहरुखसोबतचा स्वतःचा एक फोटोही शेअर केला. त्या फोटोला ‘हायलाइट’ म्हणत आयुष्यातील सर्वात मौल्यवान क्षण असल्याचं म्हटलं आहे.
श्रेया घोषालनं सगळ्यात पहिलं कोणतं बॉलिवूड गाणं रेकॉर्ड केलं असेल तर ते देवदास या चित्रपटातील बैरी प्रिया हे आहे. या चित्रपटातच शाहरुखची हटके भूमिका होती. ज्यावेळी श्रेयानं हे गाणं रेकॉर्ड केलं तेव्हा ती 16 वर्षांची होती आणि तिनं हे गाणं उदित नारायण यांच्यासोबत रेकॉर्ड केलं होतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List