Maharashtra Budget: उद्धव ठाकरे समोर येताच देवेंद्र फडणवीस यांचा नमस्कार, पण एकनाथ शिंदे यांनी केले दुर्लक्ष
Maharashtra Budget: महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात सोमवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प मांडल्यावर विधिमंडळाचे कामकाज तहकूब झाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार सभागृहातून निघाले. त्याचवेळी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे सभागृहातून निघाले. या सर्व नेत्यांची भेट विधिमंडळ गॅलरीत झाली. या भेटीत नमस्कार-चमत्कार झाले. एकमेकांवर मिश्कील टोलेबाजी झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना नमस्कार केला. परंतु एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मिश्कील टोलेबाजी केली. ते देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले, काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाही? तर अजित पवार यांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, दादा हा तुमचा अर्थसंकल्प नाही.
राजकारणी सभागृहात एकमेकांवर आरोप करत असतात. परंतु बाहेर भेटल्यावर मिश्कील टोलेबाजी करत असतात. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाही? हे सांगण्यामागील कारण शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आहेत. त्यांनी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात एका परिसंवादात शिवसेना उबाठावर गंभीर आरोप केला होता. शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज घेतल्या जातात, असा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी तो टोला मारला.
अजित पवार यांना का म्हटले…
अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प तुटीचा आहे. अनेक योजनांचा खर्चाचा बोजा त्यात आहे. त्यामुळे कोणतीही मोठी घोषणा अर्थसंकल्पात दिसत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना दादा, तुमचा हा अर्थसंकल्प दिसत नाही, असे म्हटले.
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे दिसताच न थांबता पुढे निघाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. उद्धव ठाकरेसुद्धा एकनाथ शिंदे यांना पाहून थांबले नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये विसंवाद अजून कायम असल्याचे दिसून आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List