कितीही पैसे कमावले तरी कमीच पडतात; प्रार्थना बेहेरेचा दर महिन्याचा खर्च किती ?
हिंदी मालिका ‘पवित्र रिश्ता’मध्ये काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. प्रार्थनाची ही पहिलीवहिली मालिका सुपरहिट ठरली. त्यानंतर तिने मराठी इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले. मराठी प्रेक्षकांनी देखील प्रार्थनावर भरभरुन प्रेम केले. आज प्रार्थनाचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात. नेहमी ब्रँडेड कपडे, घडाळे, पर्स वापरणाऱ्या प्रार्थना बेहेरेचा दर महिन्याचा खर्च किती असू शकतो? असा प्रश्न सर्वांना पडला असेल. आता प्रार्थनाने स्वत: यावर उत्तर दिले आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या तिचा आगामी सिनेमा ‘चिकी चिकी बुबूम बुम’चे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने नुकतीच ‘सुमन म्युझिक मराठी’च्या ‘आम्ही असं ऐकलंय’ या शोमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये तिला खासगी आयुष्यावर अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. प्रार्थनाने देखील सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
प्रार्थना बेहेरेला या मुलाखतीमध्ये महिन्याचा एकूण खर्च किती असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने, “खूप आहे, कितीही पैसे कमावले तरी कमीच पडतात, खूप खर्च आहे”, असे उत्तर दिले. तसेच तिला या मुलाखतीमध्ये तुझ्या आनंदी संसाराचा मंत्र काय? असा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. त्यावर प्रार्थनाने “एकमेकांना जगू द्या. आम्ही एकमेकांवर बंधनं घातली नाहीत. भांडणं तर होणारच, पण मला असं वाटतं की ती भांडणं त्याच दिवशी संपवण्याचा प्रयत्न करा. मी तर असंच करते. आज जर भांडण झालं तर ते दुसऱ्या दिवशी उकरून काढायचं नाही. तो विषय संपला, तिथेच संपवायचं” असे म्हटले.
प्रार्थना बेहेरेचा ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद खांडेकर यांनी केले आहे. तसेच या चित्रपटात प्रार्थनासोबत स्वप्नील जोशी, वनिता खरात, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, प्राजक्ता माळी हे कलाकार दिसणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List