“बापाला मुलाशी बोलायला..” खास व्यक्तीचं पत्र ऐकताच रितेशचे डोळे पाणावले
मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित ‘झी चित्र गौरव 2025’ सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला. झी गौरव पुरस्काराच्या 25 वर्षांच्या समृद्ध इतिहासासह यावेळी मराठी चित्रपट जगतातील तंत्रज्ञ, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि इतर प्रतिभावान व्यक्तींच्या अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यात आला. तर अभिनेता रितेश देशमुख आणि अमेय वाघ या जोडीने कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. या कार्यक्रमातील रितेशचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रितेश भावूक झाल्याचं पहायला मिळतंय. यामागचं कारण म्हणजे अभिनेता जितेंद्र जोशीने रितेशसाठी केलेल्या एका खास पत्राचं वाचन. जितेंद्र जोशीने माजी मुख्यमंत्री, दिवंगत नेते आणि रितेशचे वडील विलासराव देशमुख यांचं पत्र वाचून दाखवलं. या पत्रवाचनादरम्यान रितेशच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
“सप्रेम नमस्कार विनंती विशेष, पत्रास कारण असंय की या पत्रास काहीही कारण नाही. बापाला मुलाशी बोलायला कधीपासून कारणांची गरज भासू लागली. आमचा दांडगा जनसंपर्क तुम्हाला माहीतच आहे. तुमचा पहिला मराठी चित्रपट पाहताना खूप भरून आलं. माऊली हा चित्रपट पाहताना तर अभिमान वाटत होतं. दिग्दर्शक म्हणून तुमचा ‘वेड’ हा पहिला चित्रपट पाहिला अन् खात्री पटली की यापुढे अशीच आनंदाची अनुभूती आम्हा प्रेक्षकांना मिळत राहील. ‘तुझे मेरी कसम’चा आमचा समज तुम्ही ‘वेड’मध्ये खोटा ठरवाल असं वाटलं होतं, पण नाही. सूनबाईल अजूनही तुम्हाला पुरून उरत आहेत. गंमल बाजूला, पण रितेश.. तुम्ही वयानं आणि कर्तृत्वानं कितीही मोठे झालात तरी आम्हाला दिसतो.. तो भावंडांसोबत विहिरी पोहणारा, गुडघे फोडून सायकलची फेरी मारणारा, मातीत ढोपर सोलवटून गोट्यांचे डाव जिंकणारा, क्रिकेटची बॅट खांद्यावर घेतलेला आमचा लहान मुलगा”, अशा शब्दांत जितेंद्र पत्र वाचतो.
यापुढे तो वाचतो, “आता तुम्ही अवघ्या भारताचं दैवत, आमची प्रेरणा राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट घेऊन येत आहात. तुमच्या लूक टेस्टला मी डोळे भरून पाहिलं आणि डोळे भरून आले.” हे शब्द ऐकून रितेश भावूक होतो. वडील विलासराव देशमुख यांच्याबद्दल रितेशच्या मनात असलेलं प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. अनेकदा सोशल मीडियाद्वारे रितेश त्याच्या वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त करताना दिसतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List