Pimpri Chinchwad – शहरातील उड्डाणपुलाखाली सशुल्क वाहनतळाचा पुन्हा घाट
सशुल्क वाहनतळ धोरण राबविण्यात अपयश आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने आता शहरातील उड्डाणपुलाखाली स्मार्ट सिटी अंतर्गत सशुल्क वाहनतळाचा (‘पे अॅण्ड पार्क’) घाट घातला आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक फाटा, चिंचवड आणि निगडी या तीन ठिकाणच्या उड्डाणपुलाखाली सशुल्क वाहनतळ सुरू केले जाणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात याच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत असून रस्तेही अपुरे पडत आहेत. शहरातील ठिकठिकाणी रस्त्यावर अनधिकृतपणे तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे वाहने उभी केली जात होती. यामुळे शहरातील नागरिकांना वाहतूककोंडीच्या समस्येस तोंड द्यावे लागते. शहरातील नागरिकांसाठी वाहतूक सुरळीत होणे व वाहनतळाची सुविधा उपलब्ध होणे या हेतूने वाहतूक पोलीस आणि महापालिकेने सशुल्क वाहनतळ धोरण २०२१ मध्ये आणले होते. यासाठी ७ एप्रिल २०२१ रोजी निर्मला ऑटोकेअर या संस्थेची नेमणूक केली होती. ८० ठिकाणी वाहनतळ सुरू करण्याचे नियोजन केले होते. पहिल्यात २० ठिकाणे निश्चित केली होती. मात्र, त्यातही फक्त १६ ठिकाणीच योजनेची अंमलबजावणी सुरू केली. मात्र, अधिकाऱ्यांची निष्क्रियता, राजकीय विरोध, पोलिसांचा असहकार, पोलिसांकडून वाहनांवर कारवाईस टाळाटाळ आणि दमदाटीचे वाढलेले प्रकार यामुळे महापालिकेने गाजावाजा करत आणलेले सशुल्क वाहनतळ (पे अॅण्ड पार्क) धोरण ६ एप्रिल २०२४ मध्ये गुंडाळावे लागले होते.
सशुल्क धोरण फसले असताना आता पुन्हा स्मार्ट सिटी अंर्तगत सशुल्क वाहनतळ धोरण राबविण्यात येणार आहे. यावेळी फुटपाथ, मोकळे रस्त्याऐवजी उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत वाहनतळाचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात पुणे-मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथील भारतरत्न जेआरडी टाटा उड्डाणपूल, चिंचवड येथील संत मदर तेरेसा उड्डाणपूल आणि निगडीतील मधुकर पवळे पुलाखाली सशुल्क वाहनतळ सुरू केले जाणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात याच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. दुसऱ्या टप्प्यात डांगे चौक, काळेवाडी फाटा, जगताप डेअरी येथील साई चौक, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चापेकर। चौकात सशुल्क वाहनतळ उभारण्याचे नियोजन केले आहे.
पहिल्या टप्यात तीन उड्डाणपुलांखाली सशुल्क वाहनतळ धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्षात वाहनतळाच्या धोरणाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर शहरातील उर्वरित ठिकाणी वाहनतळ धोरणाची अंमलबजावणी केली जाईल.
– बापूसाहेब गायकवाड, सह शहर अभियंता, शहरी दळणवळण विभाग, महापालिका.
एजन्सी आणि पालिकेला किती पैसे मिळणार ?
तीन ठिकाणी सशुल्क वाहनतळ उभारण्याचे नियोजन केले असताना दुचाकीसाठी एका तासाला ५ रुपये, तर चारचाकीसाठी १० रुपये दर आकारण्यात येणार आहे. खासगी एजन्सीला पार्किंग शुल्कातून किती पैसे देणार आणि महापालिकेला किती पैसे मिळणार, याबाबत अधिकारी बोलत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List