“मातृभाषेतीलच शिक्षण चांगले, दुसऱ्या भाषेत शिकवले तर…”, युनेस्कोचा डोळे उघडणारा अहवाल प्रसिद्ध

मुलांच्या घरी जी भाषा बोलली जाते, त्याच भाषेतून जर त्यांना शिक्षण मिळाले, तर ती मुले चांगली शिकू शकतात. तसेच दुसऱ्या भाषेत जर त्यांना शिकवले गेले, तर त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. मुलांच्या शिक्षणाच्या क्षमतेत तफावतसुद्धा निर्माण होऊ शकते, असे निष्कर्ष ‘युनेस्को’ने जाहीर केलेल्या एका अहवालातून समोर आले आहेत.
युनेस्कोने ‘भाषा बाब – बहुभाषिक शिक्षणावरील जागतिक मार्गदर्शन’ हा अहवाल प्रसिद्ध केला. यात हा दावा करण्यात आला आहे. जगभरातील 40 टक्के मुलांना त्यांच्या मातृभाषेत वाचनाची सुविधा मिळत नाही, त्यामुळे अनेक मुलांना साधे-साधे वाक्य वाचता येत नाही. तसेच गणित अवघड जात असल्याचे दिसत आहे. यासोबतच मातृभाषेत शिकणारी 6 ते 8 वयोगटातील मुले अधिकृत भाषेत शिकणाऱ्या मुलांपेक्षा चांगली कामगिरी करतात, असे दिसून आले.
युनेस्कोने जागतिक भाषा अॅटलासनुसार जगभरातील सरकारांनी 8324 भाषांचे दस्तऐवजीकरण केले आहे. सध्या यापैकी 7000 भाषा वापरात आहेत, असे निदर्शनास आले आहे.
गुजरातमध्ये बोलली जाणारी वागडी भाषा राजस्थानातील डुंगरपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोलली जाते. 2019मध्ये येथील शिक्षकांनी मुलांना केवळ वागडी भाषेत शिकवण्यास सुरुवात केली. काही दिवसांनंतर जेव्हा मुलांचे मूल्यांकन करण्यात आले, तेव्हा असे दिसून आले की, त्यांचे वाचनकौशल्य आधीच्या तुलनेत सुधारले आहे.
युरोप आणि आफ्रिकेतही असेच परिणाम दिसून आले. याशिवाय जर एखाद्या मुलाला त्याच्या मातृभाषेत मूलभूत शिक्षण दिले, तर त्याला इतर भाषा शिकणे सोपे होते. हल्लीच्या पालकांचा आपल्या मुलांना मातृभाषेत शिकवण्याऐवजी इंग्रजी माध्यमात टाकण्याकडे जास्त कल असतो. ही परिस्थिती हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List