पाणीटंचाईचे भीषण सावट; पिके वाया जाण्याची भीती, शिराळ्यातील 49 पैकी 10 तलाव कोरडे

तालुक्यावर पाणीटंचाईचे भीषण सावट दिसून येत आहे. अनेक इंधन विहिरी बंद पडल्या असून, विहिरी आटत चालल्याने पाण्याचे संकट घोंगावू लागले आहे. यंदा पाण्याविना पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या 49 पैकी 10 तलाव कोरडे पडले असून, बहुतांश तलावांतील पाणीसाठा मृतसंचय पातळीच्या खाली गेला आहे. उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे पुढील काळात पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. कारण यावर्षी एप्रिल, मे महिन्यांत साधारणतः सरासरी 35 ते 38 डिग्री तापमानाची स्थिती दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाचे वाकुर्डे योजनेचे योग्य नियोजन शेतकरी वर्गाला तारणार आहे. तर आतापासूनच या योजनेद्वारे कडक उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच सर्व तलाव आवर्तनाने भरून घेणे सोयीस्कर होणार आहे.
वाकुर्डे उपसा सिंचन योजनेचे पाणी शिराळा, वाळवा तालुक्यांत आतापासूनच योग्य नियोजन करून सोडावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून संबंधित अधिकाऱ्यांकडे केली जात आहे. परंतु, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या योग्य नियोजनाच्या अभावामुळे पाण्याची पळवापळवी होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. चुकीच्या मार्गाने पाण्याची पळवापळवी करणाऱ्या लोकांवर प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे. परंतु असे होतं नसल्याने ‘वाकुर्डे योजनेचं पाणी उशाला आणि कोरड घशाला, असं म्हणण्याची वेळ बहुतांश शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.
शिराळा हा डोंगरी तालुका मानला जातो. या तालुक्याला सुजलाम् सुफलाम् बनवण्यासाठी 1994 95 साली तत्कालीन बांधकाममंत्री शिवाजीराव नाईक व लोकनेत दिवंगत फत्तेसिंगराव नाईक, तत्कालीन पालकमंत्री अण्णासाहेब डांगे यांनी वाकुर्डे योजनेची मुहूर्तमेढ रोवली. वाकुर्डे योजनेचे काम टप्प्याटप्प्याने सुरू झाले. पुढे अनेकदा राजकीय समीकरणे बदलली. तरीही माजी मंत्री शिवाजीराव नाईक व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी एकमेकांचे कट्टर विरोधक असूनही वाकुर्डे योजनेचा ध्यास सोडला नाही. मिळेल तसा निधी उपलब्ध करून योजनेचे काम सुरू ठेवले. शिराळा, वाळवा तालुक्यांत वाकुर्डे योजनेच्या नावाखाली राजकारण तापत राहिले. वर्षानुवर्षांपासून सार्वजनिक निवडणुकांमध्ये प्रत्येकाने वाकुर्डे योजनेला केंद्रबिंदू मानला गेला.
अखेर या योजनेच्या कामाला 2019 नंतर आमदार मानसिंगराव नाईक यांनी गती दिली. यावेळी स्थापन झालेल्या आघाडी सरकारच्या काळात माजी जलसंपदामंत्री आमदार जयंत पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांनी कोट्यवधींचा निधी वाकुर्डे योजनेसाठी खेचून आणला.
यंदा वाकुर्डे योजना पूर्ण सक्षमपणे कार्यान्वित कधी होणार, याची चिंता सध्या शेतकरीवर्गाला लागली आहे. जानेवारीपासून तालुक्यातील विहिरी, पाझर तलाव, बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावत असते. सध्या शिराळा, वाळवा तालुक्यांतील शिवारात पाण्याची पातळी खालावत आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी; अन्यथा पुढील काळात अनेक ठिकाणी जनावरांबरोबर शेतकऱ्यांनाही पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार आहे. सध्या तापमानाची स्थिती पाहाता तालुक्यातील शिराळा, वाळवा तलाव वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेद्वारे पावसाळ्यात अतिरिक्त पाण्याने व उन्हाळ्यात आवर्तनाने भरून घेणे सोईस्कर ठरणार आहे.
यावर्षी अनेकदा अतिवृष्टी तसेच सरासरापेक्षा तिप्पट पाऊस, पर्जन्यमान होऊनदेखील मागीलवर्षी अलनिनो त्याचप्रमाणे इतर वादळाचा परिणाम तापमानवाढीस तसेच वातावरणातील बदलास कारणीभूत आहे. त्यामुळे हवामानामध्ये अचानक तापमानात झालेल्या वाढीमुळे तलावातील पाणीसाठ्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून शिराळा तालुक्याच्या उत्तर व पूर्व भागातील सर्व पाझर तलाव हे प्रतिवर्षी वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेद्वारे पावसाळ्यात अतिरिक्त पाण्याने व उन्हाळ्यात आवर्तनाने भरून घेणे सोईस्कर होणार आहे.
रणधीर नाईक, माजी सदस्य, सांगली
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List