खोक्याभाऊ उर्फ सतीश भोसलेला प्रयागराजहून बीडमध्ये आणलं, वैद्यकीय चाचणीनंतर न्यायालयात हजर करणार
भाजप आमदार सुरेश धस यांचा लाडका खोक्याभाऊ ऊर्फ सतीश भोसले याला घेऊन बीड पोलीस महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. प्रयागराजहून त्याला छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले आणि तिथून त्याला बीडच्या शिरूर कासार येथे नेण्यात आले आहे. तिथे त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून दुपारच्या सुमारास त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
याला प्रयागराज येथे अटक करण्यात आली होती. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली होती. त्यानंतर प्रयागराज येथे न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर खोक्याचा ताबा बीड पोलिसांना मिळाला होता. बीड पोलीस शुक्रवारी पहाटे खोक्याला घेऊन छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर त्याला घेऊन पोलीस बीडला रवाना झाले.
शिरूर येथे एका जणास बेदम मारहाण करण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःच खोक्याभाऊच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच खोक्याभाऊ गायब झाले, ते एका वाहिनीवर मुलाखत देण्यासाठी उगवले. या मुलाखतीत त्यांनी आपण कसे निर्दोष आहोत हे सांगितले. माध्यमांना खोक्याभाऊचा पत्ता सापडला, पण पोलिसांना तो सापडत नसल्याने चर्चा सुरू झाली.
Satish Bhosale – बीडमध्ये खोक्याभाऊच्या घरावर बुलडोझर, वनविभागाची कारवाई
सतीश भोसले बीडमधून गायब झाला, तो थेट प्रयागराजला पोहोचला. मोबाईल लोकेशनवरून त्याचा प्रयागराजमधील ठावठिकाणा लागताच पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला. प्रकरणाचे गांभीर्य समजून घेत तातडीने कारवाई करण्याची विनंती केली. उत्तर प्रदेश पोलिसांनी खोक्याभाऊचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेतले. खोक्याभाऊ प्रयागराज विमानतळावरून पसार होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून बीड पोलीस खोक्याभाऊला घेऊन बीडमध्ये दाखल झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List