लेडी आंद्रे रसेल म्हणून ओळख मिळणे हा बहुमान, डब्ल्यूपीएल गाजवणाऱ्या चिनेल हैन्रीचे मत
सध्या सुरू असलेल्या वुमेन प्रीमियर लीग स्पर्धेत वेस्ट इंडीजची अष्टपैलू खेळाडू चिनेल हेन्री यूपी वॉरियर्ससाठी खेळत आहे. या स्पर्धेत यूपीकडून खेळताना चिनेलने दमदार कामगिरी केली आहे. चिनेलच्या फलंदाजीच्या आक्रमक शैलीमुळे तिची तुलना आधीच वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलशी होत आहे. दरम्यान रसेलशी तुलना होणे माझ्यासाठी गौरव असल्याचे चिनेल हेन्रीने म्हटले आहे.
क्रिकेटबाबत बोलताना चिनेल हेन्री म्हणाली की, खरे सांगायचे तर, लहानपणी मी कधीच फारसे क्रिकेट पाहत नव्हते. पण जेव्हा मी क्रिकेट समजून घेऊ लागले आणि खरोखरच त्यात गुंतले तेव्हा मी दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सला पाहू लागले. त्याचे क्षेत्ररक्षण, त्याची फलंदाजी, त्याच्या अष्टपैलू खेळ करण्याच्या क्षमतेमुळे मलाही त्याच्यासारखे व्हावे असे वाटू लागले. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करायचा आणि काही चेंडूंत सामना बदलायचा ते खरोखरच अविश्वसनीय होते…! एएनआयशी संवाद साधताना चिनेल हेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पुढे बोलताना चिनेल हेत्री म्हणाली की, एबी निवृत्त झाल्यानंतर, माझे लक्ष माझा देशबांधव आंद्रे रसेलकडे वळले. वेस्ट इंडिजमध्ये, अनेकजण मला लेडी आंद्रे रसेल म्हणतात, म्हणून लेडी आंद्रे रसेल म्हणून ओळख मिळवणे माझ्यासाठी बहुमान आहे. त्याच्यासारखी पॉवर-हिटिंग आणि मॅचविनिंग कामगिरी करणे हे माझे ध्येय आहे.
यंदाच्या वुमेन प्रीमियर लीगमध्ये हेन्रीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फक्त 23 चेंडूत 62 धावांची खेळी होती. या हंगामातील ही तिची सर्वोत्तम खेळी केली होती. या खेळीत दोन चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता.
200 च्या स्ट्राइक रेटने धावा
दरम्यान, यंदाच्या वुमेन प्रीमियर लीगमध्ये चिनेल हेन्रीने 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. याबाबत बोलताना ती म्हणाली, मी 150 च्या स्ट्राइक रेटने नेहमीच धावा केल्या आहेत. परंतु गेल्या वर्षभरात मी घेतलेल्या मेहनतीमुळे या स्पर्धेत माझा स्ट्राइक रेट 200 च्या वर गेला. या स्पर्धेत आम्ही काही अविस्मरणीय विजय मिळवले आहेत. जरी आम्ही संघ म्हणून कमी पडलो असलो, तरी वैयक्तिकरित्या मी सातत्याने माझ्या संघाच्या विजयात योगदान देत राहू इच्छिते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List