सायबर गुन्हेगाराने घातला न्यायाधीशांना 13 लाखांचा गंडा; नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले असताना अनेकदा जनजागृती केली जाते. मात्र, तरीही अनेक जणांना ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. नागपुरात एका न्यायाधीशांना 13 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले. फाल्कन इन्व्हॉइस डिस्काउंट या ऑनलाइन प्लॅटफार्मवर नातेवाइकांच्या सांगण्यावरून न्यायाधीशांनी गुंतवणूक केली होती. या प्रकरणी फाल्कनचा संचालक अमरदीपकुमारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित नातेवाईक 4 ते 5 वर्षांपासून गुंतवणूक करीत असल्याने न्यायाधीशांनीदेखील गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून सुरुवातीला 24 हजार रुपये गुंतवले. कंपनीने 48 दिवसांनंतर त्यांना 24 हजार रुपये मुद्दल आणि नफ्याची अतिरिक्त रक्कम बँक खात्यात जमा केली. त्यानंतर न्यायाधीशांनी 50 हजार रुपये गुंतवले.
6 जानेवारी रोजी 52 दिवस पूर्ण झाल्यावर त्यांच्या बँक खात्यात मुद्दल रकमेसह नफा म्हणून काही रक्कम खात्यात आली. ३ फेब्रुवारी रोजी त्यांनी हैदराबाद येथील लाइफस्टाइलच्या इन्व्हॉइसमध्ये एक लाख रुपये गुंतवले. त्यानंतर त्यांनी पुन्हा गुंतवणूक केली. मात्र नंतर कंपनीने प्रतिसादच दिला नाही. दोन वेळा फायदा झाल्यानंतर फाल्कनच्या त्यांच्या खात्यातून विविध कंपन्यांच्या इन्व्हॉइसमध्ये 13 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली. परंतु फाल्कनच्या खात्यात डील रक्कम जमा झालीच नाही. त्यांनी फाल्कनशी संपर्क केला असता कुणीच फोन उचलला नाही. हेल्पलाइनवर काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे फाल्कनने अनेक गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचे उघडकीस आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List