म्हाडाच्या आरक्षित रस्त्यांचे आता पालिकेला हस्तांतरण, प्राधिकरणाचा महत्त्वाचा निर्णय
म्हाडाच्या मुंबईतील भूभागांवर पालिकेच्या विकास आराखडय़ातील आरक्षित असलेल्या सार्वजनिक रस्त्यांचे हस्तांतरण आता पालिकेला तत्काळ करण्याचा महत्त्वाचा निर्णय म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी आज म्हाडा मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये जाहीर केला. या निर्णयामुळे वसाहतीतील रस्त्यांच्या देखभाल, दुरुस्ती आणि व्यवस्थापनाची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडली जाईल. तसेच शहराच्या विकास आराखडय़ाशी सुसंगत अशी रस्त्यांची उभारणी आणि सुधारणा करण्यात पालिकेला मदत होईल.
म्हाडाच्या अभिन्यासातील (ले आऊट) काही भूभागांवर पालिकेच्या विकास आराखडय़ामध्ये सार्वजनिक रस्त्यांची आरक्षणे आहेत. विकास आराखडय़ातील आरक्षित रस्ते हे सार्वजनिक हितार्थ असल्यामुळे म्हाडाच्या अभिन्यासामधील जे भूभाग सार्वजनिक रस्त्यासाठी विकास आरखडय़ामध्ये आरक्षित आहेत असे सर्व भूभाग ‘आहे त्या स्थितीमध्ये’ तत्काळ पालिकेच्या संबंधित विभागास हस्तांतरित करावेत, असे आदेश जयस्वाल यांनी संबंधित कार्यकारी अभियंता व मिळकत व्यवस्थापक यांना दिले.
मुंबईत सध्या पुनर्विकास आणि विविध विकास प्रकल्प वेगाने राबवले जात आहेत. मात्र शहराच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या वसाहतींमधील रस्त्यांचे स्थलांतरण प्रलंबित राहिल्याने अनेक विकास कामे रखडल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात अनेक बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. म्हाडाचा हा निर्णय वसाहतीतील रहिवाशांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे, कारण त्यामुळे रस्ते विकासाच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List