गुन्हेगारी रोखता येत नसेल तर काम सोडा! अजित पवार यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तंबी
पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पुण्यातील गुन्हेगारीला पायबंद घालता येत नसेल तर वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्यांनी काम सोडावे, आम्ही दुसरे अधिकारी आणतो, अशा शब्दांत अजित पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे.
शहरातील महापालिका आणि पोलीस प्रशासनाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बैठक घेतली. त्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, राजकीय हस्तक्षेप नसेल तर पोलिसांना काम करण्यात अडचण येत नाही. पुण्यात अजिबात राजकीय हस्तक्षेप होत नाही, तर मग गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. पोलीस कमी पडत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना जमत नसेल तर त्यांनी काम सोडावे. आम्ही दुसरे अधिकारी आणू. पत्रकारांशी बोलण्यासाठी मी बैठका थांबवून आलो आहे. मी परत जाणार आहे. त्यात पुण्यातील गुन्हेगारीवर पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
नवीन 200 पीएमपी बस घेणार
पीएमपीच्या ताफ्यात टाटाच्या 200 नवीन बस घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना आणि हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली आहे. साखर कारखान्यात राजकारण न करता बंद पडलेला साखर कारखाना सुरू करण्यासाठी माझा प्रयत्न असेल, असेही अजित पवार यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List