ठाण्याच्या सीपी टँक डम्पिंगवर कचऱ्याचे डोंगर, मिंध्यांच्या दुर्लक्षामुळे स्मार्ट सिटीचा कोंडमारा
डायघर डम्पिंगमध्ये टेक्निकल लोच्या झाल्याने ठाणे शहराची पुरती कचराकोंडी झाली आहे. वर्गीकरणासाठी सीपी टँक डम्पिंगवर येणारा शेकडो टन कचरा महिनाभरापासून उचललाच न गेल्याने अक्षरशः कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत. आता तर कचऱ्याच्या वर्गीकरणासाठीही जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे शेकडो घंटागाड्यांच्या रांगाच सीपी टैंक परिसरात लागल्या असून प्रचंड दुर्गंधीने वागळेतील रहिवाशांचा श्वास गुदमरला आहे. मात्र आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असतानाही मिंधे कानाडोळा करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
१) ठाणे शहरात दररोज एक हजार टन कचरा गोळा होतो. हा कचरा आधी सीपी टैंक येथील डम्पिंगवर नेला जातो. तेथे या कचऱ्याचे वर्गीकरण झाल्यानंतर पुन्हा हा कचरा डायघर येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो.
२) ठाणे शहर, कोपरी, वागळे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागातील कचरादेखील सीपी टैंक येथे आणला जातो. दररोज १५० पेक्षा अधिक कचऱ्याच्या गाड्या या ठिकाणी रिकाम्या होतात. मात्र कचरा टाकण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने सीपी टैंक परिसराच्या बाहेर अक्षरशः गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत.
३) एका घंटागाडीचा नंबर येण्यासाठी चार ते पाच तासांचा कालावधी लागत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. हे कचरा संकलन केंद्र बंद करू असे आश्वासन पालिका प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र आता डायघरमध्येच तांत्रिक बिघाड झाल्याने प्रशासनाने हात टेकले आहेत.
स्थानिकांचा केला विश्वासघात
विधानसभा क्षेत्रात येतो. याच भागात हे कचरा संकलन केंद्र आहे. हे मिनी डम्पिंग बंद करू असे आश्वासन मिंध्यांच्या बगलबच्च्यांनी येथील नागरिकांना दिले होते. मात्र प्रत्यक्षात हा प्रश्न सुटलेला नसल्याने मिंध्यांनी मतांसाठी विश्वासघात केल्याचा संताप व्यक्त होत आहे.
तांत्रिक कारणांमुळे डायघर प्रकल्पाची क्षमता काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी कचरा फेकला जात आहे. येत्या पाच दिवसांत बिघाड दूर केल्यानंतर पुन्हा एकदा कामकाज सुरळीत होणार आहे. – मनीष जोशी (उपायुक्त ठाणे महापालिका)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List