दादर-रत्नागिरी-दादर पॅसेंजर सुरु करा, अन्यथा गोरखपूर गाडी थांबवणार – विनायक राऊत
कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसून जर गोरखपूर – बरेली गाड्या सोडत असाल तर आम्ही दादरच्या पुढे या गाड्या जाऊ देणार नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी ठणकावून सांगितले. आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे महाप्रबंधकांची भेट घेऊन रत्नागिरी- दादर पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.
कोकण रेल्वे मार्गावरून रत्नागिरी- दादर पॅसेंजर गाडी अनेक वर्ष धावत होती. कोरोना काळात ही गाडी रत्नागिरी ते दिवा दरम्यान धावू लागली होती. तेव्हापासून रत्नागिरी ते दादर पॅसेंजर सुरू करा, अशी मागणी सुरू होती. अखेर मध्य रेल्वेने रत्नागिरी ते दादर ही गाडी रद्द करून त्यावेळेत दादर- गोरखपूर आणि दादर- बरेली गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. हा कोकणवासियांवर अन्याय झाला आहे. ज्यांना एक्सप्रेसने प्रवास करणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी रत्नागिरी- दादर पॅसेंजर एक आधार होता.
आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी मध्य रेल्वेचे प्रबंधक मीना यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते दादर पॅसेंजर पुन्हा सुरू करा, अशी मागणी केली. यावेळी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक मीना यांनी चांगला प्रतिसाद देत लवकरच दादर – रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List