परळीत आका आणि त्यांच्या आकाचे वेगवेगळे उद्योग, पुण्यासह वाल्मीक कराडची कुठे-कुठे किती संपत्ती? पैठणमध्ये सुरेश धस यांचे एकामागून एक गौप्यस्फोट
बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आक्रोश मोर्चाचे रुपानंतर नंतर जाहीर सभेत झाले. या सभेत भाजप आमदार सुरेश धस यांनी एकामागून अनेक गौप्यस्फोट केले. सुरेश धस यांनी वाल्मीक कराडसह मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
परळीत जे आका आणि त्यांचे आका आहे, यांचे वेगवेगळे उद्योग आहेत. परळीत इराणी समाजाचे काही लोक आहे. हे लोक या दोघांच्या जीवावर गांजा, चरस, देशी-विदेशी रिव्हॉल्व्हर विक्री करतात. या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करत होते. पिस्तुल विकलं की त्याच्यातलं कमीशनही आकाकडे पोहोचेल, अशी व्यवस्था होती. थर्मलमधील भंगार रोजच्या रोज चोरीला जातं. ते चोरीचं भंगार आणि त्यात पोलिसांचा वाटा आणि पोलिसांच्या वाट्यानंतर आकाचा वाटा…. कशा-कशात गैरप्रकार सुरू आहेत, असे म्हणत सुरेश धस यांनी गौप्यस्फोट केला.
एसटी महामंडळातील अनेक लोक एसटीतलं काही चोरतील त्याच्यावर लक्ष ठेवायला पोलीस. आणि त्या पोलिसांनी आकाला जाऊन भेटायचं असा एक प्रघात परळीत होता. करुणा मुंडे किंवा डॉ. देशमुख यांच्यावर खोट्या अॅट्रॉसिटी दाखल करायच्या. दुसरीच 354 फिर्याद द्यायची आणि त्यांचं चारित्र्यहनन करायचं. एवढचं नाही तर परळी शहरातले पोलीस आका आणि वरिष्ठ आका यांच्या इशाऱ्यावर सर्व काही गोळा करण्याचं काम करतात. जुने नवीन थर्मल पॉवर स्टेशन, सिमेंट फॅक्टरी, छोट्या मोठ्या कंपन्या या सर्वांकडून हप्ता तिथे गेलाच पाहिजे. यांच्या हप्त्यांना वैतागून एक कोरोमंडल नावाची कंपनी, ती कंपनी विकून मालक निघून गेला. हे आरोप करतोय त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं. एक आका आत गेलेत, दुसरे मोठे आका बाहेर आहेत. तर बाहेर असलेल्या आकांनी या प्रश्नांनी उत्तर द्यावीत, असा निशाणा सुरेश धस यांनी साधला.
पोलीस दलातील कर्मचारी जर आका आणि त्याचा आका यांचच ऐकून काम करत असतील तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. सोनी चॅनलमधले सीआयडीचे पोलीस, सावधान इंडियाच्या मालिकेतले कलाकार, याची नियुक्ती परळीला करावी. ओरिजनल पोलिसांची नियुक्ती आई शपथ करू नये. मुख्यमंत्र्यांना याबाबत मी लेखी पत्र देणार आहे. संत एकनाथाच्या नगरीत मी बोलतोय. ज्या माणसानं आम्हाला शांती शिकवली त्या ज्ञानेश्वरांच्या आणि संत एकनाथांच्या भूमित मी बोलतोय. सत्यमेव जयतेच्या ऐवजी असत्यमेव जयते असं नाव परळीला टाकलं पाहिजे, अशी भीषण परिस्थिती असल्याचे सुरेश धस म्हणाले.
छोटे आका आहे यांना 2022 मध्ये ईडीची नोटीस आलेली आहे. आकाने मालही काही कमी जमवलेला नाही. शिमरी पारगाव तालुका माजलगाव येथील सुदाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर 50 एकर जमीन आहे. शिमरी पारगावमध्ये मनिषा सुदाम नरवडे यांच्या नावावर 10-12 एकर जमीन आहे. शिमरी पारगावमध्येच योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन आहेत. यांच्या नावावर 15-20 एकर जमीन आहे. मौजे शेंद्रा, शेंद्री तालुका बार्शी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर तिथे 50 एकर जमीन आहे. ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर दीघोळला 10-15 एकर जमीन आहे. तर 15 एकर जमीन ज्योती मंगल जाधव दीघोळ तालुका जामखेड यांच्या नावार आहे, असा गौप्यस्फोट सुरेश धस यांनी केला.
पुण्यात एफसीरोडला वैशाली हॉटेल आहे आणि या हॉटेलच्या पलिकडे सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याच्या पार्टनरशिपमध्ये तिथे सात शॉप आकाने बुक केले आहेत. एका शॉपची किंमत आहे, पाच कोटी रुपये. त्या शॉपचे नंबर 601 ते 607 अशी आहेत. 608 वं शॉप विष्णू चाटे यांची बहीण सोनवणे यांच्या नावावर आहे. संतोष देशमुखला मारणाऱ्यातील आरोपींपैकी एका आरोपी विष्णू चाटे हा एक आहे. आणि जाधव या आकांच्या दुसऱ्या पत्नी आहेत, त्यांच्या नावावर तिथे तीन शॉप आहेत. वाल्मीक आकाच्या नावार चार आहेत. एकूण 40 कोटींचे त्यांचे शॉप आहेत. आकाने टोटल टेरेस मागितलं होतं, संध्याकाळी चालणारं हॉटेल. 35 कोटी रुपये किंमत होती. तरी आमच्या आकाने 35 कोटीत देण्याची तयारी दाखवली . पण तो छाजेड आणि पाटील यांनी नाही द्यायचं म्हटल्याने ते आकाच्या तावडीतून वाचलं, असे धस म्हणाले.
अॅमिनोरा पार्क, अँड्रोना टॉवर, मगरपट्टा हडपसर इथे एका फ्लॅटची किंमत आहे 15 कोटी रुपये. आणि त्यांनी संपूर्ण फ्लोअर म्हणजे एक मजला विकत घेतला. तो फ्लोअर वाल्मीक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे. आणि ड्रायव्हरकडून भाड्याने राहायचं अॅग्रीमेंटही केलं आहे. आणि त्याची किंमत होती 75 कोटी रुपये. आणि या दोन चौकशातच वाल्मीक अण्णा १०० कोटींच्या पुढे गेले. म्हणजे ईडीच्या दरबारात गेले. ईडीच्या 100 कोटीच्या पुढे गेलं की लगेच माणुस जातो, अशी माहिती माझ्याकडे आली आहे, असे ते पुढे म्हणाले.
मावळप्रांतामध्ये आकांनी गोरख दळवी आणि अनिल अप्पा दळवी हे बापलेक ठेवलेले आहेत. कुठे काही विकायला सापडलं की येऊद्या म्हणतात. शिल्लक ठेवायचं नाही. एखाद्यावेळेस अंबानींना सुद्ध मागे टाकतात की काय, अशी शंका आपल्या मनात येते. कृष्णा शेंडगे, हरिभाऊ इंगळे, सुदर्शन घुले, सोमा घुले, चंद्रकांत ज्ञानेश्वर घुले ही ट्रॅक्टर करणारी चोरी. ट्रॅक्टर चोरी करा, चंद चोरी करा कोणालाही मारा, आका तुमच्या सोबत आहे. परळीमध्ये एका वर्षात 109 मृतदेह सापडले आहेत. 109 पैकी 5 मृतदेह रेकॉर्डवर आलेत. 104 मृतदेहांची ओळखही पटली नाही आणि कशामुळे मेलेत याचाही काही पत्ता नाही. काहींची फक्त हाडं सापडली आहेत. अशी एकंदरीत परिस्थिती आहे मग का हिंमत होणार नाही संतोष देशमुखच्या अंगावर जायची. कोणासाठी हे खंडणी वसूल करायला गेले, त्यामुळे आका हा शंभर टक्के 302 चा आरोपी आहे. आणि या मधल्या काळात आका आणि आकाच्या आका फोन झाला असेल तर आकाचा आका सुद्धा लाईनमध्ये असेल, असा दावा सुरेश धस यांनी केला.
जरीन खान पट्टेवाला हा संभाजीनगरमधला मुस्लिम बांधव याला परळीच्या पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि मारहाण केली. त्यातच तो मेला. मेल्यानंतर याचं काय करायचं? त्यानंतर संभाजीनगरमधल्या त्याच्या कुटुंबाच्या घरी गेले आणि 40 लाखांत मिटवून घ्या म्हणाले. 40 लाखात माणूस विकता? असे सांगत सुरेश धस यांनी आणखी एक प्रकरण उघड केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List