सामना अग्रलेख – रुपयाची चड्डी घसरली!
रुपया असाच पडत राहिला तर भारतीय उद्योजकांना परदेशी चलन मिळवणे कठीण जाईल. ज्यांची मुले परदेशात शिकत आहेत, त्यांचे बजेट उद्ध्वस्त होईल. परदेशातील विद्यार्थ्यांना भारतातून जास्त रक्कम पाठवावी लागेल. सामान्य भारतीयांचे हाल वाढतील. रुपयाचे अवमूल्यन चिंताजनक आहे. 2013 मध्ये रुपयाच्या घसरण्यावरून ‘टिव टिव’ करणाऱ्या आणि ‘डॉलर’ अंडरवेअरचे उदाहरण देत तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका करणाऱ्या जुही चावलास कोणीतरी हे सांगायला हवे. ‘डॉलर’ अंडरवेअरचे उत्पादन बंद झाले काय, हे जुही चावलाने स्पष्ट करावे! देशाच्या अर्थव्यवस्थेची ‘चड्डी’ साफ घसरली आहे. देश कोसळत असल्याचे हे संकेत आहेत!
देशात काँग्रेसचे राज्य असताना गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांना रुपयाचे अवमूल्यन पाहवत नव्हते. डॉलर्सच्या तुलनेत रुपयाची घसरण पाहून त्यांच्यातला राष्ट्रवाद उसळ्या मारीत होता. मोदी म्हणत, ‘‘जसजसा रुपया घसरतोय तसतशी भारताची प्रतिष्ठाही घसरत असते, पण भारताच्या प्रतिष्ठेची काँग्रेसला चिंता नाही.’’ मोदी यांना रुपयाच्या घसरणीची चिंता वाटत होती तेव्हा रुपया जागतिक बाजारात डॉलरच्या तुलनेत ‘60’ होता व आज मोदी काळात ‘87’ इतका घसरला. म्हणजे काँग्रेसच्या तुलनेत मोदी काळात भारताची प्रतिष्ठा व रुपया सर्वाधिक पडला आहे. तरीही मोदी हे विश्वगुरू असल्याचा डंका त्यांचे भक्त पिटत आहेत. मोदींचे अंधभक्त सर्वच क्षेत्रांत आहेत. अक्षय कुमार, अनुपम खेर, जुही चावला या सिने कलावंतांचाही त्यात समावेश आहे. 2013 मध्ये 1 डॉलर 60 रुपये इतका होता व रुपयाची ही घसरण पाहून जुही चावला बेजार झाली होती. तेव्हा रुपयाच्या चिंतेने जुही चावलाने एक जोरदार ट्विट केले होते. ‘‘देवाची कृपा आहे, आपल्या अंडरवेअरचे (म्हणजे चड्डीचे) नाव ‘डॉलर’ आहे. चड्डीचे नाव ‘रुपया’ असते तर सारखी खाली पडत राहिली असती.’’ आज एका डॉलरचा भाव 86.60 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. हा सगळ्यात नीचांक आहे. जुही चावला आता कोठे आहे? सिनेमावाल्यांच्या ‘चड्ड्या’ आता खाली पडत नाहीत काय? दुसऱ्या एका ‘ट्विट’मध्ये जुही चावलाने ‘रुपयाला स्वतःला वाचविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे डॉलरला राखी बांधणे,’ असा टोला हाणला होता. मग आता सर्वात नीचांकी गेलेल्या रुपयाला वाचविण्यासाठी जुही चावला डॉलरला संक्रांतीच्या पतंगाचा मांजा बांधायला सांगणार आहे का? देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका
डॉलरची किंमत
एक रुपया इतकी होती. आज एक डॉलर घेण्यासाठी साधारण 87 रुपये द्यावे लागतात. याचा अर्थ भारताची अर्थव्यवस्था कोलमडली आहे व देशात आर्थिक अराजक माजले आहे. देशावर कर्जाचा डोंगर वाढतो व तिजोरीचा रिकामा डबा होतो तेव्हा रुपयाची घसरण जागतिक बाजारात सुरू होते हे साधे अर्थशास्त्र आहे. रुपया अस्थिर आहे याचा सरळ अर्थ भारतात विकासाची गती मंदावली आहे व सरकार विकासकामे करण्यात कमी पडले आहे. भारत भविष्यात पाच ट्रिलियन डॉलर अशी महाकाय अर्थव्यवस्था होणार असल्याचे सांगितले जाते. भारतात परकीय गुंतवणूक येईल व रोजगार वाढेल, गरिबी दूर होईल अशा भाषणांनी कान विटले आहेत. केंद्र सरकार देशातील 85 कोटी लोकांना फुकट धान्य देते तेव्हा त्यांची दोन वेळची चूल पेटते. नोकऱ्यांचा तर बाजार उठला आहे. पंजाबचा शेतकरी शेतीमालास बाजारभाव मिळावा म्हणून आंदोलनास उतरला आहे. हे वातावरण उत्साहवर्धक नाही. एक-दोन उद्योगपतींचीच भरभराट सरकारी कृपेने होत आहे व बाकीच्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या जात आहेत. देशाचे वातावरण उद्योग-व्यापारासाठी स्वच्छ आणि मोकळे राहिलेले नाही. गेल्या दहा वर्षांत भारतातील पाच लाख मध्यम उद्योजक व गुंतवणूकदार हे परदेशात जाऊन स्थायिक झाले. त्यामुळे परदेशातून गुंतवणूक येत आहे असे सांगणे हे खोटेपणाचे आहे. रुपयावर या सगळ्याचा प्रभाव पडतो व तो घसरतो. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम रुपयावर होतो हा दावा खरा नाही. तेलाच्या किमती स्थिर झाल्या तरीही रुपयाचे मूल्य वाढले नाही. रुपया कमजोर झाल्यामुळे ‘आयात’ महाग झाली. डॉ. मनमोहन सिंग यांच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था दुरुस्त करणारा योद्धा निर्माण झाला नाही. मोदी यांनी दहा वर्षांत अत्यंत
तकलादू लोक
अर्थमंत्रीपदावर विराजमान केले. त्यांनी अर्थव्यवस्थेचा साफ खेळखंडोबा केला. मोदींनी जबरदस्तीने लादलेल्या नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्थेचे जगात हसे झाले व रुपयाला कायमची घरघर लागली. भारतीय चलनात आजही मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा ओघ आहे व काळा पैसा मोठ्या प्रमाणात परदेशी बँकांत आहे. देशाची अर्थव्यवस्था प्रवाही नसून त्याचे डबके झाले आहे. हे डबके म्हणजे पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असा कोणी दावा करीत असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात आहेत. कुंभ सोहळे, राममंदिराची उद्घाटने, मशिदींचे खोदकाम करणे अशांवर हजारो कोटींचा खर्च होत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी हजारो कोटी ‘फुकट रेवडी’ योजना जाहीर होतात. त्यात ‘लाडकी बहीण’सारख्या योजना आहेत. या सर्व योजनांसाठी कर्ज काढावे लागते. त्या कर्जावर देशाचा गाडा हाकला जातो. रुपया घसरून पडण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे. भारतातील विदेशी गुंतवणूक थांबली आहे व ज्यांनी ही गुंतवणूक केली, त्यांनी ती मागे घेऊन पुन्हा अमेरिकेची तिजोरी भरण्याचा उपक्रम सुरू केला आहे. रुपया असाच पडत राहिला तर भारतीय उद्योजकांना परदेशी चलन मिळवणे कठीण जाईल. ज्यांची मुले परदेशात शिकत आहेत, त्यांचे बजेट उद्ध्वस्त होईल. परदेशातील विद्यार्थ्यांना भारतातून जास्त रक्कम पाठवावी लागेल. पंतप्रधान मोदी हे त्यांचे परदेश दौरे सुरूच ठेवतील, पण सामान्य भारतीयांचे हाल वाढतील. रुपयाचे अवमूल्यन चिंताजनक आहे. 2013 मध्ये रुपयाच्या घसरण्यावरून ‘टिव टिव’ करणाऱया आणि ‘डॉलर’ अंडरवेअरचे उदाहरण देत तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका करणाऱ्या जुही चावलास कोणीतरी हे सांगायला हवे. ‘डॉलर’ अंडरवेअरचे उत्पादन बंद झाले काय, हे जुही चावलाने स्पष्ट करावे! देशाच्या अर्थव्यवस्थेची ‘चड्डी’ साफ घसरली आहे. देश कोसळत असल्याचे हे संकेत आहेत!
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List