अदानीचा बुलडोझर शिवसेनेने रोखला, वांद्र्याच्या भारतनगरमधील ‘एसआरए’च्या कारवाईला स्थगिती
शिवसेनेच्या दणक्यानंतर वांद्रय़ाच्या भारतनगरमधील झोपडय़ांवर ‘एसआरए’ने सुरू केलेल्या तुघलकी कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. ‘एसआरए’ने रहिवाशांना कोणतीही नोटीस न देता ‘अदानी’च्या माध्यमातून पुनर्विकासाच्या नावाखाली थेट कारवाईला सुरुवात केली होती. याची माहिती मिळताच शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे, स्थानिक आमदार आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी भारतनगरमध्ये जाऊन रहिवाशांना पाठिंबा देत कारवाईला विरोध केला. अखेर हादरलेल्या ‘एसआरए’ने कारवाईला स्थगिती दिल्याचे जाहीर केले. यामुळे 180 झोपडीधारकांना मोठा दिलासा मिळाला.
अचानक राहते घर तोडल्यास जाणार कुठे, असा प्रश्न निर्माण झाल्याने सर्व रहिवाशांनी कारवाईला जोरदार विरोध केला. मात्र ‘एसआरए’ कारवाई करण्यावर ठाम राहिल्याने पोलीस आणि रहिवाशांमध्ये प्रचंड बाचाबाची झाली. यावेळी जबरदस्तीने कारवाई करण्यास सुरुवात झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.
कोणताही सर्व्हे, कोणतीही नोटीस न बजावता एसआरएकडून अदानीसाठी गुंडागर्दी करून झोपडपट्टीवर कारवाई करण्याचे जाहीर करण्यात आले. बोगस आणि जुने परिशिष्ठ दाखवून हा प्रकार सुरू आहे. याला आमचा ठाम विरोध आहे.
– मोहम्मद रफिक, रहिवासी
आधी लोकांना विश्वासात घ्या -वरुण सरदेसाई
सरकारला कुणाच्याही माध्यमातून या ठिकाणी विकास करायचा असेल तर नक्कीच करावा, मात्र याआधी रहिवाशांना विश्वासात घेऊन चर्चा करावी. एसआरएने कोणतीही नोटीस न बजावता केलेली कारवाई अन्यायकारक आहे. आता रहिवाशांसोबत दिलेल्या लढय़ाला यश आले आहे. प्रशासनाकडून कारवाईला स्थगिती दिल्याचे आश्वासन देण्यात आले आहे, अशी माहिती आमदार वरुण सरदेसाई यांनी दिली. प्रशासनाने माणुसकीला धरून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
…तर अधिकाऱ्यांच्या घरांवर धडक -आदित्य ठाकरे
एसआरएचे अधिकारी काय करत आहेत? आम्ही एसआरएच्या अधिकाऱयांच्या घरांवर मोर्चा काढला तर काय होईल? या घरांना हात लावायचा प्रयत्न केल्यास तुमचे अधिकारी राहतात ही सर्व लोक त्यांच्या घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिला. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करून एसआरएचे अधिकारी दलाली करत आहेत. अदानी असो किंवा कुणीही असो, रीतसर काही करत असतील तर आक्षेप नाही, पण अन्यायकारकपणे जबरदस्तीने कुणी काही करत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरून जनतेची ताकद दाखवू. हेच चित्र उद्या धारावीत दिसू शकतं. तुमच्या-आमच्या घरांवरही अशी कारवाई होऊ शकते. यांना फक्त मुंबई गिळायची आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
कारवाई होऊ देणार नाही
वांद्रे पूर्वेला याआधी ‘एचडीआयएल’ दिवाण बिल्डरचा प्रकल्प 97-98 साली सुरू आहे, मात्र आता 25-26 वर्षे होऊनही लोकांना घरे मिळालेली नाहीत. दिवाण जेलमध्ये गेल्यानंतर अदानी आला आहे. आता अदानीची इथे गुंडागर्दी सुरू आहे. आमची तिसरी पिढी इथे राहात आहे. कुठलाही करार न होता थेट कारवाई करण्याचा प्रयत्न होतो. पैसे किंवा कुठे घर देणार काहीही सांगितले जात नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही कारवाई करू देणार नाही, असा इशारा स्थानिक महिलांनी दिला आहे.
वांद्रय़ाच्या भारतनगरमध्ये 180 झोपडीधारक गेल्या 40 वर्षांपासून या ठिकाणी राहत आहेत. या रहिवाशांना ‘एसआरए’ने कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता थेट पुनर्विकासासाठी झोपडय़ा अनधिकृत असल्याचे सांगत कारवाई सुरू केली. यासाठी जेसीबी, बुलडोझर, शेकडो कर्मचारी आणि प्रचंड पोलीस बळाचा वापर करून कारवाईला सुरुवात केली. अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे रहिवासी बिथरले.
‘एसआरए’चे लोक निर्लज्जपणे अदानीची साथ देत आहेत. कायद्याचे राज्य राहिलेले नाही, मात्र आम्ही असली दादागिरी खपवून घेणार नाही. यांना मुंबई गिळायची आहे, पण ते आम्ही होऊ देणार नाही. – आदित्य ठाकरे, शिवसेना नेते
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List