संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना पकडा नाहीतर आम्हाला गोळ्या घाला! मस्साजोग गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन
मस्साजोग गाव भीतीच्या छायेखाली आहे. येथील ग्रामस्थांनी आज सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन केले. तब्बल सहा तास महिला, पुरुष तलावाच्या पाण्यात उभे होते. या आंदोलनात संतोष देशमुख यांचा मुलगाही सहभागी झाला होता. तीन आठवड्यांपासून आम्ही फक्त ‘कोणालाही सोडणार नाही’ असे ऐकत आहोत. मारेकरी कधी पकडणार ते सांगा, उगाच तोंडाची वाफ दवडू नका, आरोपी तरी पकडा, नाहीतर आम्हाला तरी गोळय़ा घाला’, असे खडे बोलच मस्साजोगच्या महिलांनी यावेळी पोलीस अधीक्षकांना सुनावले. ‘दहा दिवसांत आरोपींना पकडतो’, असे सांगून काँवत यांनी मस्साजोगमधून काढता पाय घेतला.
‘आमच्या राजाला न्याय पाहिजे’ असे फलक गावकऱयांनी जागोजागी लावले आहेत. न्यायासाठी मस्साजोगवासीय आक्रमक झालेत. ग्रामस्थ आंदोलन करत असताना पोलीस उपअधीक्षक मीना, तहसीलदार काठावर उभे राहून मजा पाहत होते. आंदोलन सुरू असताना तीन महिला चक्कर येऊन पाण्यात पडल्या; परंतु पोलिसांनी कोणतीही मदत केली नाही.
मस्साजोगच्या ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत हे स्वतः आंदोलनस्थळी आले. परंतु आक्रमक झालेल्या महिलांनी पाण्याबाहेर येण्यास नकार दिला. ‘आरोपींना कधी पकडणार ते अगोदर सांगा!’ असा आग्रह महिलांनी धरला. त्यावर काँवत यांनी दहा दिवसांत आरोपींना बेडय़ा ठोकण्याचे आश्वासन दिल्यानंतर सर्व ग्रामस्थ पाण्याबाहेर आले. या आंदोलनादरम्यान प्रभावती भीमराव सोळंके (45) या महिलेची प्रकृती खालावल्याने तिला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पोलीस अधीक्षकांची बोलती बंद!
आंदोलक महिला पाण्याबाहेर येताच पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी त्यांना खंडणी प्रकरणातील तपासाची माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु आक्रमक झालेल्या महिलांनी ‘वाल्मीक कराडच्या शरणागतीवर पाठ थोपटून घेऊ नका!’ असा बॉम्बगोळा टाकला. संतोष देशमुख यांची हत्या झाल्याबरोबर नाकेबंदी केली असती तर आरोपी फरार झाले नसते, असे खडे बोलही महिलांनी सुनावले.
तपासासाठी एसआयटी
सीआयडीकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच गृहविभागाने आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन केली आहे. बसवराज तेली यांनी मागणी केल्यानुसार एसआयटी पथकात अनिल गुजर (पो. उपअधीक्षक), विजयसिंग जोनवाल (स.पो. निरीक्षक), महेश विघ्ने (पो.उ. निरीक्षक), आनंद शिंदे (पो.उ. निरीक्षक), तुळशीराम जगताप (सहा. पो. उ. निरीक्षक), मनोज वाघ, चंद्रकांत काळकुटे, बाळासाहेब अहंकारे, संतोष गित्ते यांचा समावेश आहे.
सीआयडीचे तिघांना समन्स
वाल्मीक कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर दोन कोटींची खंडणी आणि संतोष देशमुख हत्या या दोन्हींचा संबंध या अनुषंगाने तपास केला जात आहे. त्यामुळे सीआयडीने सरपंच हत्या प्रकरणात तीन लोकांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List