‘योगीधाम’च्या घटनेनंतर कल्याण, डोंबिवलीत संताप.. संताप.. संताप; मुजोर शुक्लाविरोधात डीसीपी कार्यालयावर धडक
धूप लावण्याच्या किरकोळ वादातून परप्रांतीय अधिकाऱ्याने कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीतील मराठी कुटुंबाला गुंडांकरवी बेदम मारहाण केल्याच्या घटनेनंतर कल्याण, डोंबिवलीत संतापाची लाट पसरली आहे. बुधवारी रात्री रहिवाशांनी तक्रार करूनही पोलिसांनी मात्र व्हीआयपी ट्रीटमेंट देत शुक्लाला फरार होण्यास मदत केली. माथेफिरू शुक्लाला पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप करत आज योगीधाम परिसरातील नागरिकांनी डीसीपी कार्यालयावर घडक देत शुक्लासह त्याच्या गुंड टोळीला अटक करण्याची मागणी केली. मराठी माणसांवर अन्याय होत असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह विविध संघटना आक्रमक होताच पळपुट्या शुक्लासह तीन हल्लेखोरांना 36 तासांनंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
36 तासांनंतरही शुक्लाला पोलीस अटक करत नसल्याने अजमेर हाईट्समधील रहिवाशांनी कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेऊन सर्व आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते विजय साळवी, संघटक रुपेश भोईर, उपशहर संघटक सुरक्षित पातकर, विभागप्रमुख सतीश वायचळ, शाखाप्रमुख विशांत कांबळे, वाहतूक सेनेचे नीलेश भोर, गणेश नाईक यांच्यासह मराठा क्रांती मोर्चा, योगीधाम व्यापारी असोसिएशन, मायमराठी प्रतिष्ठानसोबत विविध संघटनांच्या शिष्टमंडळांनी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेऊन पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली.
जर मराठी माणूस पेटून उठला तर काय परिस्थिती होईल याचा विचार पोलिसांनी करावा. आरोपींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. मराठी माणसांच्या घरात घुसून व प्लॅन करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. आरोपीच्या एफआयआरमध्ये कलम 109 अंतर्गत कारवाई व्हावी. आकसापोटी देशमुख कुटुंबावर जे गुन्हे दाखल केले आहेत ते सर्व मागे घ्यावेत अन्यथा शिवसेना उग्र आंदोलन छेडेल.
– विजय साळवी, शिवसेना उपनेते
अमेरिकेतून आलेल्या सनी पवारनेही देशमुख कुटुंबाला दिला धीर
अमेरिकेहून व्हेकेशन साजरा करण्यासाठी मुंबईला आलेला सनी पवार या तरुणानेही कल्याणमध्ये येऊन देशमुख कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला. सनी म्हणाला, दैनिक ‘सामना’मध्ये मराठी माणसावरील हल्ल्याची बातमी वाचून मला खूप दुःख झाले. त्यामुळे आज मी स्वतः कल्याणमध्ये येऊन देशमुख कुटुंब यांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. सगळ्या मराठी माणसांनी आपली एकजूट दाखवलीच पाहिजे.
मुजोर शुक्लासह दोघांना अटक
मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यानंतर उपायुक्त झेंडे यांनी शुक्लासह सुमित जाधव (23) आणि रंगा उर्फ दर्शन बोराडे (22) या हल्लेखोरांना अटक केल्याची माहिती दिली. शिवाय उपनिरीक्षक लांडगे दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली. या संपूर्ण प्रकरणाची एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्फत चौकशी सुरू असून उर्वरित हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत.
पोलिसांनी ताटकळत ठेवले
देशमुख आणि कळवीकट्टे कुटुंबीयांनी तक्रार देण्यासाठी खडकपाडा पोलिसांत धाव घेतली. मात्र बुधवारी रात्री 10 पासून गुरुवारी पहाटे पाच वाजेपर्यंत या कुटुंबाना पोलीसांनी ताटकळत ठेवले. तक्रार दाखल होऊ नये यासाठी पोलीसच अभिजित देशमुख यांच्यावर दबाव टाकत होते. शुक्लानेसुद्धा तुमच्या विरोधात तक्रार दिल्याचे सांगत उपनिरीक्षक लांडगे यांनी देशमुख कुटुंबावरही गुन्हा दाखल केला.
पोलीस ठाण्यात शुक्लाची शाही बडदास्त
अभिजित देशमुख तक्रार देण्यासाठी खडकपाडा पोलीस ठाण्यात आल्यानंतर काही वेळानंतर अखिलेश शुक्ला पोलीस ठाण्यात आला. यावेळी खासगी गाडीवर अंबर दिवा आणि कमरेला पिस्तुल लावून शुक्ला पोलीस ठाण्यात वावरत होता, असे काही रहिवाशांनी सांगितले. यावेळी उपनिरीक्षक लांडगे यांनी शुक्लाची शाही बडदास्त ठेवली होती. अर्ध्या तासानंतर शुक्लाला पोलिसांनी घरी पाठवून दिले. शुक्लाने विनयभंग केलेल्या मराठी भगिनीला आणि गुंडांनी डोके फोडलेल्या रहिवाशांना मात्र पोलिसांनी सात तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्याचे पाप केले.
मराठी माणसांबद्दल शुक्ला कायमच तुच्छतेने बोलतात. परप्रांतीयांना आमच्याबद्दल आकस का? गुंड आणून मारहाण आणि विनयभंग याची शासन काही दखल घेणार आहे का?
लता कळवीकट्टे, रहिवासी
मारहाण आणि विनयभंगाची घटना निंदनीय आहे. किरकोळ वादात शुक्ला यांनी प्रांतवाद आणल्यामुळे सर्वांची मने दुखावली आहेत.
– उमेश वाघ, रहिवासी
आम्ही सगळे गुण्यागोविंदाने अजमेरा सोसायटीत राहतो. पण शुक्ला यांनी जे मराठी लोकांबद्दल वक्तव्य केले आहे ते निषेधार्ह आहे.
अतुल सरगर, रहिवासी
शुक्ला याला शासकीय नोकरीतून निलंबित केले पाहिजे. बिल्डिंगमध्ये त्याचा व त्याच्या परिवाराचा खूप अत्याचार वाढला आहे. शुक्ला कुटुंबीय सोसायटीच्या सदस्यांना नाहक त्रास देत असतो.
वैशाली गरुड, रहिवासी
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List